मंडणगड : आंबडवे राजेवाडी राष्ट्रीय महामार्गावर तुळशी ते माहूरदरम्यान पावसात खचलेल्या रस्त्याची डागडुजी न केल्याने होणाऱ्या अपघातांचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत संबंधित विभागाने या ठिकाणी दुरुस्तीकामाला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
आंबडवे ते राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत ठेवल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना अपघात होऊन दुखापती होत आहेत. तुळशी येथे पावसात खचलेला काँक्रिट रस्ता अद्याप दुरुस्त न केल्याने गाड्या हवेत उडून जोरात आदळण्याचे प्रकार घडत असून, यात प्रवाशांना गंभीर मार बसत आहे; मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. वृत्त प्रसिद्ध होताच दुपारनंतर या ठिकाणी पोकलैंड आणून जुने खचलेले काँक्रिटीकरण काढण्याचे काम सुरू करण्यात आले. पावसात खचलेली एक बाजू बंद करण्यात आली होती, ती प्रथम नव्याने सिमेंट काँक्रिटीकरण करून तयार करण्यात येणार आहे; मात्र रस्त्यावरील आत्तापर्यंतची कामाची पद्धत पाहता ही दुरुस्ती वेळकाढूपणा ठरू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत तसेच अर्धवट अवस्थेत ठिकठिकाणी ठेवण्यात आलेली कामे पूर्णत्वास नेऊन नागरिकांचा प्रवास सुरक्षित करावा, अशी मगणी करण्यात येत आहे.
खड्डे भरण्याच्या कामावर आक्षेप
दापोली फाटा ते मंडणगड शहरापर्यंत रात्री भरण्यात येणाऱ्या खड़े भरण्याच्या प्रक्रियेला हरकत घेत नागरिकांनी आक्षेप नोंदवला. मलमपट्टी करत असल्याचे पाहून संबंधित यंत्रणेला धारेवर धरण्यात आले. परिपूर्ण प्रक्रियेने खड्डे भरावेत, अशी मागणी करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 07/Dec/2024