राजापूर : जिल्ह्यातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र बंद करण्याचा घाट रेल्वे विभागाने घातला आहे. दररोज अपेक्षित तिकीट विक्री होत नसल्याचे दाखवून रेल्वे विभागाकडून तसे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुसरीकडे चारही ठिकाणी असलेल्या पोस्ट आरक्षण सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच रेल्वे विभागाने घेतलेल्या अवसान घातकी निर्णयामुळे समस्त प्रवाशांचे मोठे नुकसान होणार असून सध्यस्थितीत राजापूर वगळता अन्य तीन ठिकाणी रेल्वे आरक्षण सेवा सुरू असून रेल्वे विभागाच्या वक्रदृष्टीमुळे भविष्यात चारही ठिकाणची आरक्षण सेवा बंद होण्याच्या मार्गावर आहे.
गाड्यांचे आरक्षण करणे प्रवाशांना सुलभ व्हावे यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सेवा केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर येथे काही वर्षांपूर्वी ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र राजापुरात तशी सेवा सुरू करण्यात आली नव्हती. त्यानंतर अनेक वर्षे राजापूर येथील पोस्ट कार्यालयात त्या सुविधेसाठी जोरदार पाठपुरावा सुरू होता. अथक प्रयत्नानंतर एक वर्षापूर्वी राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे विभागाच्यावतीने आरक्षण सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. तेथे एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला होता. आवश्यक ती सुविधा पुरवण्यात आली होती. अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाल्यामुळे तालुकावासियांमधून समाधान व्यक्त होत होते. मागील वर्षभरात प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत होता.
तसाच प्रतिसाद जिल्ह्यातील अन्य तीन पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सुविधा केंद्रांना देखील मिळत होता. कुठेतरी माशी शिंकली आणि रेल्वे विभागाने अचानक जिल्ह्यातील चारही ठिकाणी असलेली रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र बंद करण्याचा घाट घातला. त्याला तांत्रिक कारण देखील पुढे करण्यात आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दर दिवशी किमान पाच आरक्षणाचे व्यवहार झालेच पाहिजेत, असा फतवा जारी करण्यात आला होता. त्यानंतर आता रेल्वे विभागाकडून जिल्ह्यातील चारही ठिकाणी असलेल्या पोस्ट कार्यालयातील आरक्षण सुविधा केंद्रे बंद करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत जिल्हा पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्यावतीने ही माहिती समोर आली.
चारही पोस्ट सेवेतील सुविधा केंद्रे सुरू रहावीत याबाबत पोस्ट विभाग सकारात्मक असून त्यांच्यावतीने मिळालेल्या माहितीनुसार या विभागाच्यावतीने दिल्लीपर्यंत रेल्वेचे विभागाशी तसा पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर मुख्य शहरांपासून अनेक रेल्वे स्थानके ही दूरवर असून पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा कार्यान्वित असल्याने समस्त प्रवाशांना रेल्वेची तिकिटे सहज उपलब्ध होत होती.
जर ही सेवा बंद करण्यात आली तर भविष्यात रेल्वे प्रवाशांवर मोठा अन्याय होणार असून रेल्वे विभागाने जिल्ह्यातील चारही ठिकाणी कार्यान्वित असलेली पोस्ट कार्यालयातील आरक्षण सुविधा केंद्र सुरू ठेवावी, अशी जोरदार मागणी जनतेतून करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या उत्तम नेटवर्क सेवा उपलब्ध करा
राजापूर पोस्ट कार्यालयातील आरक्षण सुविधा केंद्रामधील निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गेल्या आठवडाभराहून अधिक काळ ते आरक्षण केंद्र बंद आहे. तेथे निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यात यावा शिवाय चांगल्या प्रकारची नेटवर्क सेवा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी जोरदार मागणी राजापूरमधून करण्यात आली आहे. जर रेल्वे प्रशासनाने पोस्ट कार्यालयातील आरक्षण सेवा बंद करण्याचा प्रयत्न केला तर ती बाब खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही रेल्वे प्रवाशांमधून देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 07/Dec/2024