देवरुख : मोकळ्या जागेतील ठिकाणी एखादी आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक बंब त्वरित त्या ठिकाणी पोहोचतो.
मात्र एखाद्या अरुंद ठिकाणी, गल्लीबोळात आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणण्यासाठी मोठा बंब त्या जागेपर्यंत पोहोचणे कठिण होते. यासाठीच देवरुख नगर पंचायतीकडून अशा गल्लीबोळातील आग आटोक्यात आणण्यासाठी फायर बुलेटची मागणी करण्यात आली होती.
या मागणीला यश आले असून, नुकतीच एक फायर बुलेट देवरूख नगर पंचायतीला प्राप्त झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी दिली आहे.
ग्रामीण भागात तसेच गल्लीबोळात अग्निशामक बंब पोहोचू शकत नाही. यामुळे जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणावर घडते. यावर उपाय शोधण्यासाठी यंत्रणेकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला यश आले नव्हते. आता मात्र त्यावर अत्याधुनिक उपाय शोधण्यात आला आहे आणि तो म्हणजे फायर बुलेटचा वापर करणे.
फायर बुलेटवरून अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी प्रवास करू शकतात. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी तत्काळ पोहोचून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले जाणार आहे. अत्याधुनिकीकरण करणे, त्यामध्ये जलदता आणणे, कमी खर्चामध्ये व कमी मनुष्यबळामध्ये घटनास्थळापर्यंत तत्काळ पोहोचण्यासाठी ही यंत्रणा फायर बुलेटच्या स्वरुपात कार्यरत असणार आहे.
फायर बुलेटसाठी रॉयल्ड एनफिल्ड ३५० सीसीची बुलेट मॉडिफाईड करण्यात आली आहे. यामध्ये ९ लिटर क्षमतेचे दोन फोम सिलिंडर बसवण्यात आले आहेत. पंपाचा प्रेशर ३.५ हॉर्स पॉवरचा असेल. या फायर बुलेटवर देवरूख नगर पंचायतीचे लिंगप्पा हळमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुठेही आगीचा प्रसंग घडल्यास देवरूख नगर पंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन विसपुते यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 07/Dec/2024