पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल- जवळेथर रस्त्यावर मूरखिंड ते तळवडे-ताम्हाणे फाटा दरम्यान खड्डे पडले असून, या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या खड्यातील मोठी खडी रस्त्यावर आल्याने त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे.
खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहतुकीला धोकादायक बनला आहे. येत्या आठ दिवसात या रस्त्याची तातडीने दुरूस्ती न झाल्यास सर्व पक्षिय कार्यकर्त्यांच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा कोकण विकास आघाडीचे राजापूर तालुका संघटक व सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी दिला आहे.
पावसाळा संपला, निवडणुका झाल्या व आचारसंहिता देखील संपली. मात्र प्रशासन, स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी याबाबत चिडीचूप असल्याने जनतेमधून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी अशा तीन जिल्ह्यांना जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा असा मार्ग आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.
पुणे येथून गोव्याकडे जाणारी सर्व वाहतूक याच मार्गावरून होते. मूरखिंड ते तळवडे-ताम्हाणे फाटा दरम्यान मोठ-मोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची पुर्णतः चाळण झाली आहे. पावसाळा संपल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती होईल, अशी जनतेची अपेक्षा होती.
मात्र आजही हे खड्डे जैसे थे स्थितीत आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. या मार्गावर असलेल्या खड्क्यांमुळे वाहने नादुरूस्त होण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 07/Dec/2024