गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी प्रास्तविक केले. त्यांनी महापरिनिर्वाण ही संकल्पना समजून सांगितली. त्यामागील बौद्धधर्माचा विचार स्पष्ट केला. बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांचे प्रतिबिब स्वातंत्रोत्तर भारताच्या अर्थव्यवस्थेत, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमागे पडलेले कसे दिसून येते, याचा मागोवा घेतला. शिक्षण हेच विकासाचे सूत्र मानून अनेक शिक्षण संस्था बाबासाहेबांनी उभ्या केल्या आणि सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. या योगदानास त्यांनी अधोरेखित केले. शेवटी आपल्या स्वरचित कवितेमधून डॉ. मधाळे यांनी बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सूत्रबद्ध मांडणी केली. ते म्हणाले की, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही तत्त्वे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कृतींच्या केंद्रस्थानी होते. समताधिष्ठित राष्ट्र निर्माण करण्यातील त्यांचे योगदान मोठे होते.

कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेघना म्हादये यांनी केले. यावेळी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 07-12-2024