चिपळूण : मार्कडी स्वामी मठ ते रामेश्वर मंदिर रस्त्याला १० कोटींचा निधी

चिपळूण : शहरातील मार्कडी स्वामी मठ ते रामेश्वर मंदिर या महत्त्वाच्या नागरी वस्तीमधील पर्यायी वर्दळीच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व नूतनीकरणासाठी आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून दहा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून धूळ, खडीच्या गर्तेत गुरफटलेला हा महत्त्वाचा रस्ता लवकरच सुस्थितीत येणार आहे.

मागील पंधरा वर्षापासून मार्कडी स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्ता दुरूस्ती व रुंदीकरणाचा मोठा गाजावाजा केला जात होता. प्रत्यक्षात मात्र या कामाला सुरुवात होण्यास दहा वर्षांचा कालावधी उलटून गेला. मात्र, सद्यस्थितीत रस्त्याचे झालेले काम हे महाराष्ट्र हायस्कूल ते रामेश्वर मंदिर तिठ्यापर्यंत पूर्ण झाले आहे. शहरातील सलग सुमारे दोन कि.मी. लांबीचा, सुमारे साठ फूट रुंदीचा हा रस्ता रामेश्वर मंदिर तिठ्यापर्यंत येऊन थबकला, त्यापुढे केवळ या रस्त्याच्या कामाला कागदोपत्रीच वाटचाल मिळत राहिली. एकीकडे वाशिष्ठी नदी किनाऱ्यावर जुना कोयना फरशी पुलानजिक साठे मोहल्ला ते भाटण असा नवा पूल अंतम टप्प्यात आहे. या पुलामुळे चाळीस टक्के शहराच्या नागरी वस्तीमधील वाहतूक महाराष्ट्र हायस्कूल मार्गे थेट मार्कडीपर्यंत सुरू राहणार आहे. परंतु गत पंधरा वर्षात रामेश्वर मंदिर तिठा ते मार्कडी स्वामी मठ या भागातील रस्त्याचे काम न झाल्यामुळे केवळ धुळधाण झाली आहे.

रस्त्यानजिक पवन तलाव मैदान व स्टेडियम आहे. पर्यायी अंतर्गत वाहतूक आणि वर्दळीस हा मार्ग नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. असे असतानाही काही तांत्रिक अडचणींमुळे या रस्त्याचे काम अनेकदा हाती घेऊनही रखडले होते. मात्र, आता आमदार निकम यांच्या पाठपुराव्यामुळे दहा कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. येत्या काही महिन्यात कामाची निविदा प्रक्रिया व या रस्त्याची मजबुती व नूतनीकरणाचे काम सुरू होईल.

तांत्रिक अडचणी दूर होणे गरजेचे
मुळात या रस्त्याची रुंदी दोन्ही बाजूंनी मिळून साठ फुटांची असल्याने या तांत्रिक अडचणी काम करण्यापूर्वी सोडवाव्या लागणार आहेत. एका बाजूला घरे तर दुसऱ्या बाजूला पवन तलाव मैदानाची संरक्षक भिंतीसहीत मैदानाचे स्टेडियम, स्टेडियममधील दुकान गाळे व समोरच असलेला नाला, सांडपाण्यासाठीची गटारे आणि न.प. मालकीची कोपऱ्यावरील मोकळी जागा या तांत्रिक अडचणी दूर झाल्यास या रस्त्यावर होणारा दहा कोटींचा खर्च फलद्रूप ठरेल, याचाही विचार होणे गरजेचे आहे. मूळ प्रस्तावित रस्त्याची साठ फुटांची रूंदी व सांडपाणी निचऱ्यासाठी असलेला नाला व स्टेडियमचे गाळे या सर्वांचा विचार करून दहा कोटी रूपये रस्ता नूतनीकरण व मजबुतीकरणासाठी खर्च व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 07/Dec/2024