रत्नागिरी : पारंपरिक सोमेश्वर पावट्याचे होणार संवर्धन

रत्नागिरी : कृषि विभागाच्या पारंपरिक बियाणे संवर्धन योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या पावट्याचे संवर्धन आणि मार्केटिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमेश्वर पावट्याचे बियाणे लागवडीसाठी हेक्टरी साडेसात हजार रुपये कृषी विभागाकडून देण्यात येणार आहे. त्यासाठी सोमेश्वर येथील शेतकऱ्यांकडून बियाणे विकत घेतल्याची पावती दाखवल्यानंतर या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र कमी असले तरीही पूर्वापार वायंगणी म्हणजेच हिवाळ्यातील शेतीला अनेक शेतकरी प्राधान्य देतात. भातकापणी झाल्यानंतर पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी कुळीथ, पावटा, चवळी, वाल या पालेभाज्यांसह फळभाज्यांची लागवड करत आहेत. त्यामधून अनेक शेतकरी उदरनिर्वाह करतात. काही विशिष्ट ठिकाणी पिकवण्यात येणारी कडधान्ये लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यात सोमेश्वरी पावट्याचे आवर्जून नाव घेतले जाते. काजळी नदीकिनारी परिसरात लागवड करण्यात येणारा पावटा चवीसाठी उत्कृष्ट आहे. काजळी खाडी परिसर असल्यामुळे तिथे होणाऱ्या या पावट्याचे महत्व पार मुंबईपर्यंत पोचलेले आहे. गेली अनेक वर्षे होत असलेल्या या पावट्याची दखल सरकार दरबारी घेण्यात आली आहे.

सोमेश्वर परिसरात सुमारे १५ एकरवर पावट्याचे पीक घेतले जाते. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्यात पावट्याची लागवड केली जाते. कृषी विभागाने हेक्टरी ७ हजार ५०० रुपये अनुदान बियाण्यासाठी देण्याचे निश्चित केले आहे. या माध्यमातून वाणाचे संवर्धन होणार असून, अन्य शेतकरीही वाणाची लागवड करण्यासाठी उद्युक्त होणार आहेत. अनेक हायब्रिड बियाण्यांचे उत्पन्न अधिक असले तरीही त्याचे तेवढेच दुष्परिणाम आहेत. त्यामुळे सोमेश्वरी पावट्याचा प्रचार व प्रसार केला जात आहे. तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याने हे बियाणे विकत घेतले तर त्याला अनुदानाचा लाभ मिळणार आहे. २० हेक्टर क्षेत्रावर लाभ देणार असल्याचे रत्नागिरी तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

सोमेश्वरी पावट्यात पारंपरिक पौष्टिक गुणधर्म आहेत. त्याचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी त्याचे जतन केले जाणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील अन्य कोणत्याही कडधान्याच्या पारंपरिक बियाण्याची लागवड करता येणार आहे. त्यासाठी २४० हेक्टरपर्यंत उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. – विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 07-12-2024