लांजात १७५ वनराई बंधारे बांधून पूर्ण

लांजा : तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता अधिक भासू नये यासाठी पंचायत समिती प्रशासन सतर्क झाले आहे. पाणीटंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने २०२४-२५ या वर्षाकरता संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला नसला तरी तत्पूर्वीच लांजा पंचायत समिती विभाग सतर्क झाला असून, लांजा तालुक्यात ६०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सध्या १७५ वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले असल्याचे पंचायत समिती प्रशासनाने सांगितले.

पाणीटंचाई निवारण्यासाठी आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात लवकरच प्रशासनाची एक बैठक होणार आहे. या बैठकीत लांजा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मागणीनुसार पाणी पुरवठा नियोजन केले जाणार आहे. लांजा तालुक्यात डिसेंबर महिन्यानंतरच पाणी टंचाई भासण्यास सुरुवात होत.

फेब्रुवारी मार्चमध्ये पाणीटंचाईचे स्वरूप अधिक तीव्र होत असते. तालुक्याच्या दुर्गम भागातील गावांना प्रथम पाणीटंचाईची झळ सोसावी लागते. यावर्षी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समिती व तहसील प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना १० बंधारे बंधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लोक सहभागाच्या आणि श्रमदानातून हे वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. बांधण्यात येणाऱ्या वनराई बंधाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील गावांमधील पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार आहे.

पूर्वभागातील जलसाठे आटू लागले
तालुक्यात पाणीटंचाई भासणाऱ्या गावांमध्ये कमी-जास्त वाढ होत असते. यावर्षी लांजा पूर्वभागातील पाण्याचे जलसाठे खालावत असल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे पूर्व भागातील गावांना पाणी टंचाईची झळ लवकर बसू शकते. चिंचुर्टी धावडेवाडी व पालू गावाला पाणी टंचाईची झळ लवकर बसत असते; मात्र लांजा पंचायत समिती विभागाकडून राबविण्यात येणारी बंधारे मोहीम तालुक्यातील पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लांजा तालुक्यात प्रथम अती दुर्गम भागातील गावांना पाणी टंचाईची झळ अधिक पोहचत असते. यामध्ये पाणी टंचाईग्रस्त गावांना व त्यामधील वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गावांच्या मागणीनुसार प्रशासनाकडून पाणी पुरवठा केला जाणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी लांजा तालुक्यामध्ये बंधारे, आणि नव्याने जलस्त्रोत बांधण्यात आल्याने काहीअंशी पाणी टंचाईग्रस्त गावे कमी झाली आहेत. तालुक्यात दरवर्षी ४४ गावे व ९८ वाडांना पाणीटंचाईची झळ बसते. प्रत्येकवर्षी ही गावे व वाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असुन त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तालुक्यात गतवर्षी पाणी टंचाईग्रस्त गावांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षांपूर्वी १२६ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 09/Dec/2024