रत्नागिरी : शहराजवळील सडामिऱ्या-जाकिमिऱ्या भागात होणाऱ्या पोर्ट औद्योगिक क्षेत्राबाबत पुढच्या आठवड्यात मिऱ्यावासीयांना भेटणार आहे. लोकांना हवा तो निर्णय घेणार; पण चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेऊन निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
पोर्ट औद्योगिक क्षेत्रासाठी सडामिऱ्या-जाकिमिऱ्या भागातील १७६.१४९ हेक्टर खासगी क्षेत्र संपादित केले जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना जुलैला जारी झाली होती. विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगक्षेत्राला चालना मिळावी, नवे उद्योग यावेत यासाठी प्रत्येक तालुक्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु याला सडामिऱ्या- जाकिमिऱ्या दोन्ही भागातून तीव्र विरोध झाला. दोन्ही ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये या पोर्ट औद्योगिक क्षेत्राला कडाडून विरोध झाला. तसा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. त्यानंतर दोन्ही ग्रामपंचायतींची एकत्रित सभा झाली. त्यामध्येही एकमताने या प्रकल्पाला विरोध केला. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, मी पुढच्या आठवड्यात मिऱ्या ग्रामस्थांना भेटणार आहे. याबाबत चर्चा करून लोकांना हवा तो निर्णय घेतला जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 27/Sep/2024