राजापूरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी

राजापूर : शहरातील तहसीलदार कार्यालय आणि राजापूर पोलिस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनचालकांसह पादचारी हैराण झाले आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या वाहनांमुळे ही कोंडी होत असून त्यावर उपाययोजना कधी होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

उंच-सखल आणि तीव्र उत्तार अशी राजापूर शहरातील भौगोलिक स्थिती आहे. मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील प्रमुख शासकीय कार्यालय, दवाखाने, विविध राजकीय पक्षांची कार्यालये शहरामध्ये असल्याने लोकांची शहरामध्ये सातत्याने वर्दळ असते. अनेकजण एसटी बसने येतात तर काही खासगी गाड्यांनीही शहरामध्ये येतात. जकातनाका ते जवाहरचौक या मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यासमोरील भागामध्ये होणाऱ्या वाहतूककोंडीने वाहनचालकांसह पादचारी त्रस्त झाले आहेत. तहसील कार्यालयामध्ये कामानिमित्ताने लोकांची ये-जा सुरू असते. कामानिमित्ताने आलेल्या लोकांकडून आपल्या खासगी गाड्या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये पार्किंग केल्या जातात. त्या ठिकाणीही जागा उपलब्ध नसल्याने या गाड्या तहसील कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा पार्किंग करून ठेवलेल्या असतात. सोमवार आणि गुरुवार असे आठवड्यातील दोन दिवस या ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दुतर्फा वाहने उभी करून ठेवल्यामुळे वाहतू‌ककोंडी होते. त्यावर उपाययोजना करा, अशी मागणी ग्रामस्थांसह पादचा-यांकडून केली जात आहे.

शहरामध्ये पुरेशी मोकळी अशी पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने मिळेल्या त्या मोकळ्या जागेमध्ये वा रस्त्याच्या बाजूला खासगी वाहनचालकांकडून गाड्या उभ्या करून ठेवलेल्या असतात. शहराच्या मुख्य रस्त्यासह जवाहर चौक परिसर आणि बाजारपेठेमध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीवर योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी वाहनचालकांकडून मागणी केली जाते. त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 11/Dec/2024