लांजा : लांजा नगरपंचायतीने घाई गडबडीत, भोंगळ कारभार करून, कोत्रेवाडी येथे वाडीवस्तीलगत प्रस्तावित केलेला डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करून तो योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा, अशा मागणीचे निवेदन भाजपाच्या लांजा राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी प्रांताधिकारी राजापूर-लांजा यांना आज शुक्रवारी सादर केले.
कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द होण्यासाठी भाजपा नेत्या उल्का विश्वासराव यांनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात उल्का विश्वासराव यांनी म्हटले आहे की, लांजा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कोत्रेवाडी येथे घनकचरा प्रकल्प (डम्पिंग ग्राउंड) नगरपंचायतीकडून नियोजित आहे. कोत्रेवाडी येथील प्रस्तावित करण्यात जागेत घाई गडबडीत, भोंगळ कारभार करून आणि बोगस प्रस्ताव घेऊन वाडीवस्तीजवळ डम्पिंग ग्राउंड प्रकल्प जोर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न आहे.
यामुळे स्थानिकांचे जनजीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी प्रांताअधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे चर्चा करून तसेच मागणीचे निवेदन सादर केलेले आहे. परंतु ग्रामस्थांच्या मागणीकडे नगरपंचायत व प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे निदर्शनास झाले आहे. त्यामुळे प्रस्तावित कोत्रेवाडी येथील घनकचरा प्रकल्प रद्द करून तो योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा. जेणेकरून ग्रामस्थांना कोणताही त्रास होणार नाही अशी मागणी या निवेदनाद्वारे उल्का विश्वासराव यांनी केली आहे. हे निवेदन आज शुक्रवारी प्रांताधिकारी यांना सादर करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 27/Sep/2024