आ. किरण सामंत यांचे आदेश आणि रत्नागिरी-काळबादेवी मार्गावरील बंद असलेल्या फेऱ्या पूर्ववत

◼️ आगार व्यवस्थापकांचे पत्र; उपोषण मागे घेण्याचे आवाहन

​रत्नागिरी:
रत्नागिरी-काळबादेवी मार्गावरील बंद असलेल्या एसटी बसफेऱ्या पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी देण्यात आलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याची दखल एसटी प्रशासनाने घेतली आहे. याबाबत आमदार किरण उर्फ भय्या सामंत यांनी स्वतः लक्ष देत या मार्गावरील बंद असलेल्या एसटीच्या फेऱ्या तत्काळ पूर्ववत करा अशा सक्त सूचना आगार व्यवस्थापक यांना केल्या. या नुसार या मार्गावरील फेऱ्या तातडीने सुरू करण्यात येत असल्याचे पत्र रत्नागिरी आगार व्यवस्थापकांनी दिले असून, आंदोलकांना आपले उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
​
​काळबादेवी येथील शिवसेना शाखाप्रमुख श्री. संदेश बनप यांनी २७ एप्रिल रोजी प्रशासनाला पत्र देऊन, सकाळी ८:०५, १०:२५ आणि दुपारी १:२५ च्या बंद असलेल्या बसफेऱ्या चार दिवसांत सुरू न झाल्यास १ मे २०२६ पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. या निवेदनावर तातडीने कार्यवाही करत रत्नागिरी आगार व्यवस्थापकांनी (वरिष्ठ) सविस्तर उत्तर दिले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार सध्या वाहन आणि चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे काही शहरी फेऱ्या नाईलाजास्तव बंद ठेवाव्या लागल्या होत्या. उन्हाळी सुट्ट्या आणि गर्दीचा हंगाम लक्षात घेता, १४ पैकी केवळ ३ फेऱ्या महिनाभरासाठी थांबवण्यात आल्या होत्या.
​
​आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने फेऱ्यांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये दुपारी ०१:२५ ची फेरी आता दररोज नियमितपणे सुरू करण्यात येत आहे. सकाळी ०६:०० आणि ०८:०० च्या फेऱ्या: प्रायोगिक तत्त्वावर या फेऱ्या आता सुट्टीच्या दिवशीही सुरू राहतील. सकाळी १०:२५ ची फेरी कर्मचारी आणि वाहन टंचाईमुळे सध्या शालेय सुट्ट्या संपेपर्यंत सुरू करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

​”प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सकारात्मक पाऊल उचलले असून, दुपारी १:२५ ची फेरी पूर्ववत केली आहे. त्यामुळे आंदोलकांनी १ मे रोजीचे प्रस्तावित उपोषण मागे घ्यावे,” असे आवाहन आगार व्यवस्थापकांनी केले आहे.

​या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विभाग नियंत्रक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे काळबादेवी परिसरातील प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Radhakrushna patapedhi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 30-04-2026