चिपळूण : कापरे येथील ग्रामसेवक गणेश लोखंडेंच्या बदलीने गावकऱ्यांना अश्रू अनावर

चिपळूण : गावस्तरावर शासकीय कामे करताना काहीजणं दिवस ढकलण्यावर भर देतात तर काही तन्मयतेने मन लावून झोकून कार्यरत राहतात. झोकून देत काम करणाऱ्यांची दखल ग्रामस्थांमधूनही घेतली जाते. याचा प्रत्यय कापरे येथील ग्रामसेवकाची जिल्हा बदली झात्यानंतर आला. ग्रामसेवक गणेश लोखंडे यांची जिल्हा बदली झाल्यावर ग्रामस्थांना अक्षरशः अश्रू अनावर झाले होते. ग्रामपंचायत पदाधिकान्यांसह ग्रामस्थांनी वाडीनिहाय उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला.

ग्रामसेवक गणेश लोखंडे हे कापरे ग्रामपंचायतीत ११ ऑक्टोबर २०१७ मध्ये रुजू झाले. कापरे येथे ग्रामसेवक म्हणून त्यांनी सुरुवातीपासूनच झोकून देत काम करण्यास सुरुवात केली. नम्र स्वभावामुळे घराघरांतील ग्रामस्थ, महिला, वडीलधारी मंडळी, आणि तरुणांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले. गरजू लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कोणी विरोधात भूमिका घेतली तरीही त्यांचा नम्रपणे स्वीकार करीत योग्य तेच काम करण्यावर गणेश यांचा भर असायचा. कुटुंबातील व्यक्तीप्रमाणेच प्रत्येकाला सन्मानाची वागणूक ते देत या कामाची पोचपावती लोखंडे यांच्या निरोप समारंभावेळी मिळाली. ग्रामसेवक लोखंडे यांची जिल्हा बदली झाल्यामुळे कापरे ग्रामपंचायतीत निरोप समारंभाचे आयोजन केले होते. त्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह वाडीवाडीतील ग्रामस्थ, बचत गटाच्या महिला, पंचायत समितीचे माजी सदस्य, ग्रामस्थ, विविध मंडळे, ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. या निमित्ताने गावातील जे अधिकारी निवृत्त झाले. त्यांचाही सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ शिक्षक बळीराम मोरे यांचाही समावेश होता. यावेळी विशेषतः ग्रामसेवक लोखंडे यांना निरोप देताना सर्वजण भावूक झाले. त्यांची इतरत्र बदली झाली असती तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून ती रद्द करण्याची विनंती केली असती. अशा भावनाही ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

असा पहिलाच प्रसंग
एखाद्या ग्रामसेवकांची बदली झाल्यावर ग्रामपंचायतीतर्फे निरोपाचे सोपस्कार पार पडतात; परंतु या पध्दतीने निरोप समारंभ करण्याची ही घटना ठरली आहे. ग्रामस्थांच्या या प्रेमाने भारावलेल्या लोखंडे यांचेही डोळे भरून आले होते. याप्रसंगी ग्रामस्थांनी लोखंडे यांच्यासह आई-वडील आणि पत्नीचाही सत्कार केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 13/Dec/2024