चिपळूण : राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिरात विद्यार्थ्यांना चार भिंती बाहेरील शिक्षण दिले जाते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे शिबिर खऱ्या अर्थान विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करते, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी व्यक्त केले. डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या चिंचघरी (गणेशवाडी) येथे आयोजित ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
प्राचार्य डॉ. बापट पुढे म्हणाले की, शिबिरातून विद्यार्थ्यांना विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक पैलूंचा अभ्यास करण्याची संधी मिळते. शारीरिक कष्टासोबतच विविध उपक्रमांमधून बुद्धीची मशागतसुद्धा केली जाते, ज्यामुळे शरीर व मन संतुलित राहते. त्यामुळे अशा शिबिरातून मिळालेला मौलिक ठेवा विद्यार्थ्यांनी आयुष्यभर जतन करून ठेवावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, सामाजिक जाणीव, स्वावलंबन यासारख्या मूल्यांची रुजवणूक शिबिरातून होते. शिबिरामध्ये आयोजित विविध व्याख्यानातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व श्रमदान आणि इतर उपक्रमांमधून विद्यार्थी नामक हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम होत असते, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अतुल चितळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप, पर्यवेक्षिका सौ. स्नेहल कुलकर्णी, चिंचवरी गावचे प्रभारी सरपंच राजेश चाळके, माजी सरपंच रमेश चाळके, पंचायत समितीचे माजी सभापती राजाराम चाळके, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार प्रा. विनायक बांद्रे, प्रा. स्वप्नील साडविलकर, प्रा. विठ्ठल कोकणी, प्रा. प्रदीप वळवी, दिशा दाभोळकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 14/Dec/2024














