रत्नागिरी : गेले चार दिवस परतीच्या पावसाचा कोकणातील जिल्ह्यात सुरू असलेला धुमाकूळ शुक्रवारी काही प्रमाणात ओसरला. रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली. काही भागांत हलक्या सरी झाल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली होती.
अरबी सागरात प्रभावी असलेला कमी दाबाचा पट्टा निवळल्याने शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. दरम्यान, शुक्रवारी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४८ मि.मी.च्या सरासरीने ४३० मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली.
गेले चार दिवस म्हणजे सोमवार ते गुरुवारपर्यंत पावसाने रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाची आघाडी उघडली होती. त्यामुळे अनेक भागांत उभे
राहिलल्या भाताच्या पिकाला धोका निर्माण झाला होता. मात्र, लोंब्यापर्यंत आलेल्या भाताच्या रोपामध्ये सातत्याने झालेल्या पावसामुळे हिरवेपणा टिकून राहिल्याने काही भागात पिकावरील धोका टळल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या कालावधीत झालेल्या जोरदार पावसाने बांधाची पडझड झाल्याने बांधालगत असलेल्या रोपांची हानी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शुक्रवारी पावसाचा जोर ओसरल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. काही भागात पावसाने उघडीपही दिल्याने भात खाचरातील साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासही मदत झाली असल्याचे येथील भात उत्पादक शेतकरी गणेश पाडावे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 28-09-2024