खेडमध्ये फिरती आरोग्य सेवा उपक्रम

रत्नागिरी : देशातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अन्नपूर्णा २ एम सामूहिक फिरती आरोग्य सेवा (कम्युनिटी मोबाईल हेल्थकेअर) हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील १६ गावांत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून २०३० पर्यंत २० लाख लोकांना सेवा देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्यात महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. वनस्टेज या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने कोर्टेव्हा अॅग्रीसायन्स आणि दीपक फाऊंडेशन यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात नुकतीच एका सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आली. खेड तालुक्यातील पीरलोटे येथील ग्रामपंचायत सभागृहात हा कार्यक्रम झाला. कोर्टेव्हा अॅग्रीसायन्स, वनस्टेजचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद साधला. यावेळी परिसरातील ५०० पेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. प्रत्येक एमएचयूमध्ये पात्रताधारक वैद्यकीय व्यावसायिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच ते निदानासाठी आवश्यक साधने आणि औषधांनी सुसज्ज असतील. यामुळे लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळतील, याची हमी मिळेल.

प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरुकता
या उपक्रमातून ग्रामीण लोकांना प्रचलित आरोग्य समस्यांबद्दल आणि गैर- संसर्गजन्य रोग, संसर्गजन्य रोग आणि सामान्य निरोगीपणा यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागृत करण्यात येईल. खेडमधील १६ गावांमध्ये प्रत्यक्ष आरोग्य सेवा पुरवून वैद्यकीय सेवांची उणीव भरून काढण्याचे कम्युनिटी मोबाईल हेल्थकेअर प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 28/Sep/2024