Vijay Mallya : माझ्याकडून 6203 कोटींऐवजी 14131 कोटी केले वसूल; विजय माल्ल्याचा दावा

विजय माल्ल्याची (Vijay Mallya) संपत्ती विकून विविध बँकांना 14 हजार कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. याशिवाय निरव मोदीचीही संपत्ती विकून 1053 कोटी रुपये देखील बँकांना देण्यात आले.

या दोन्हीसह विविध घोटाळ्यात अडकलेल्या रकमेसह एकूण 22280 कोटी रुपये संबंधितांना परत करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत माहिती दिली होती. मात्र, या कारवाईवर विजय माल्ल्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. माझ्याकडून 6203 कोटींऐवजी 14131 कोटी केले वसूल केल्याचा दावा माल्ल्याने केला आहे. तसेच ईडीसह बँकांवर देखील आरोप करण्यात आले आहेत.

अर्थमंत्री सीतारामन यांनी काल लोकसभेत सांगितले की, या मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना यशस्वीपणे परत करण्यात आल्या आहेत. नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (NSEL) आणि रोज व्हॅली यांसारख्या घोटाळ्यांव्यतिरिक्त विजय मल्ल्या आणि नीरव मोदी प्रकरणांसारख्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये ही वसुली करण्यात आली आहे.

ईडीने चुकीच्या पद्धतीने वसुली केल्याचा विजय माल्ल्याचा आरोप

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत माहिती दिली की, बँकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींकडून 22,280 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विजय माल्ल्याकडून 14,131 कोटी रुपयांची आणि नीरव मोदीकडून 1,052 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिलेल्या वक्तव्यावर फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीने आपल्याविरुद्ध चुकीच्या पद्धतीने वसुली केल्याचा आरोप त्यांनी केला. विजय माल्ल्या यांनी अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर प्रतिक्रिया दिली आहे. ईडीकडून 14,131 कोटी रुपयांच्या मालमत्तेची वसुली आणि त्याच्यावर करण्यात येत असलेली कारवाई योग्य नाही. डेट रिकव्हरी ट्रिब्युनल (डीआरटी) ने किंगफिशर एअरलाइन्स (केएफए) चे कर्ज 6,203 कोटी रुपये निश्चित केले आहे, ज्यामध्ये 1,200 कोटी रुपयांचे व्याज देखील समाविष्ट असल्याचे माल्ल्यानं म्हटलं आहे.

विजय माल्ल्याकडून ईडीसह बँकांवर आरोप

विजय माल्ल्याने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत आपले म्हणणे मांडणार आहे. न्यायाची अपेक्षा असल्याचेही माल्ल्याने सांगितले आहे. सरकार कुणालाही पळून जाण्याची संधी देणार नाही आणि बँकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांसारख्या आर्थिक गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात आहे. देश सोडून पळून जाणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील, असा संदेशही यातून दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 19-12-2024