चेन्नई : ‘मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. या निर्णयाचा कुठलाही खेद नसल्याचे अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने गुरुवारी सांगितले. ऑस्ट्रेलियातून मायदेशात आगमन होताच चाहत्यांनी आपल्या लाडक्या अण्णाचे गुलाबपुष्पांचा वर्षाव करीत, तसेच ढोल- ताशांचा गजर करीत जल्लोषात स्वागत केले.
गुरुवारी पहाटे अश्विनचे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्य क्रिकेट संघटनेचे अधिकारी त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते. ७६५ बळी घेणाऱ्या ३८ वर्षांच्या अश्विनने माध्यमांशी संवाद साधणे टाळून आपल्या कारकडे जाणे पसंत केले. कारमध्ये त्याच्या दोन्ही मुली बसल्या होत्या. घरी दाखल होताच त्याने आई-वडिलांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांशी संवाद साधला.
ब्रिस्बेनच्या तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्तीची घोषणा करणारा अश्विन म्हणाला, ‘माझ्या चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण असू शकतो. माझा निर्णय पचविण्यास त्यांना थोडा वेळ लागेल. माझ्यासाठी ही दिलासादायी आणि समाधानाची बाब आहे. मी या निर्णयाचा काही दिवसांपासून विचार करीत होतो. माझ्यासाठी हा फार मोठा निर्णय नव्हताच.’ राष्ट्रीय संघाचे नेतृत्व न करू शकल्याचे शल्य आहे का, असे विचारताच अश्विन म्हणाला, ‘मला कुठलाही खेद नाही. मी अनेकांना पश्चात्ताप करताना पाहिले. मात्र, मला कुठलीही खंत वाटत नाही.’
घरी पोहोचताच वडिलांनी अश्विनला मिठी मारली. त्याला फुलांचा हार घालण्यात आला. उपस्थितांनी त्याची स्वाक्षरी घेतली. शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदनाचा वर्षाव केला. यावर भारावलेला अश्विन म्हणाला, ‘इतके लोक येतील, असा विश्वास नव्हता. मी गुपचूप परतणार होतो; पण तुम्ही मला आनंद दिला. मागच्या दोन वर्षांपासून मी निवृत्तीविषयी विचार करू लागलो होतो. भविष्याबाबत कोणतेही लक्ष्य निर्धारित केलेले नाही.’
अश्विनने अपमानामुळे निवृत्ती घेतली : वडिलांचा आरोप
अश्विनच्या वडिलांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अंतिम एकादशमध्ये स्थान मिळत नसल्याने त्याला तो अपमान वाटला असावा आणि म्हणून त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला असावा, असा आरोप केला. अपमान हे एक कारण असेल. अश्विनचा निर्णय कुटुंबासाठी भावनिक असल्याचे सांगताना त्याचे वडील म्हणाले, ‘अपमान किती काळ सहन करणार? त्यामुळे त्याने निर्णय घेतला असावा.’
अश्विन आमच्या वाटेतील काटा होता : मिचेल स्टार्क
ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने भारताविरुद्ध खेळताना अश्विन आमच्या वाटेतील काटा होता, असे वक्तव्य करीत अश्विनचे कौतुक केले. स्टार्क म्हणाला, ‘भारताविरुद्ध खेळताना अश्विन नेहमीच आमच्या वाटेतील काटा होता. त्याची कारकीर्द खास राहिली आहे, मला खात्री आहे त्याने त्याच पद्धतीने कारकिर्दीचा आंनद घेतला असेल.’ अश्विन आणि नाथन लियोन यांच्या मैत्रीबद्दल स्टार्कने सांगितले की, ‘अश्विन आणि लियोनची चांगली मैत्री होती आणि ते एकमेकांचा खूप आदर करतात.’
अश्विन योग्य निरोपाचा हकदार : कपिल देव
रविचंद्रन अश्विनच्या अचानक निवृत्तीवर आश्चर्य व्यक्त करीत माजी कर्णधार कपिल देव यांनी हा स्टार ऑफ स्पिनर घरच्या मैदानावर योग्य निरोपाचा हकदार होता, असे वक्तव्य केले. कपिल यांच्या मते, अश्विन कुठेतरी दुखावलेला होता. चाहते निराश आहेत, पण मी अश्विनच्या चेहऱ्यावर निराशा पाहिली. हे वेदनादायी आहे. त्याला उत्कृष्ट निरोप मिळायला हवा होता. अश्विन काही काळ थांबून घरच्या मैदानावर निवृत्त होऊ शकला असता. अश्विनची बाजू जाणून घ्यायला मला आवडेल. भारतीय क्रिकेटमध्ये अश्विनच्या अमूल्य योगदानाची बरोबरी होणे फार कठीण आहे.’
२०२५ मध्ये अनेक दिग्गज निरोप घेण्याची शक्यता
रविचंद्रन अश्विनची निवृत्ती ही फक्त सुरुवात आहे. २०२५ मध्ये अनेक दिग्गज निरोप घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नव्या दमाच्या खेळाडूंसाठी पुढचे वर्ष हे बदलाचा काळ ठरणार आहे. ‘क्रिकबा’ने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील वर्षी जून-जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याच्या आधी टीम इंडियात बदलाचे वारे वाहू लागतील. सध्याची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका ही डब्ल्यूटीसी भारतीय संघातील जुन्या पिढीसाठी ही शेवटची मालिका असू शकते. अश्विनसह विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यांनीदेखील २०१२ ते २०१३ मध्ये टीम इंडियात झालेल्या अशाच बदलांच्या काळात कोअर खेळाडू म्हणून स्थान निर्माण केले होते. त्यावेळी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी निवृत्ती घेतली.
चांगली कामगिरी करणाऱ्यांसाठी भारतीय संघाचे ‘दरवाजे खुले आहेत’, असे कर्णधार रोहित शर्मा वारंवार सांगत असला तरी चेतेश्वर पुजारा आणि रहाणेपासून टीम इंडिया बरीच पुढे गेल्याचे जाणवते. अश्विनलाही असेच काही संकेत मिळाले, कारण वॉशिंग्टन सुंदरने अचानक न्यूझीलंड मालिकेत प्रवेश केला आणि पर्थ कसोटीत त्याला जडेजा आणि अश्विनच्या वर संधी देण्यात आली. अश्विनचा निवृत्तीचा निर्णय किती नियोजनबद्ध होता हे ठामपणे सांगता येणार नाही मात्र भारतीय संघ लवकरच बदललेला दिसू शकतो. २०२५ च्या उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये पुढील कसोटी मालिका सुरू होईपर्यंत हे बदल होत राहतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:53 20-12-2024