◼️ कट्टर भाजप कार्यकर्त्याने केली होती पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार
रत्नागिरी : शहरातील काँग्रेस भवन येथील रस्त्यावर येणारे सांडपाणी ही परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी झाली होता. यासाठी खुद्द भाजप माजी नगरसेवक देखील प्रयत्न करीत होते मात्र रत्नागिरी नगरपालिकेकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. याच परिसरात राहणाऱ्या एका कट्टर भाजप कार्यकर्त्याने याबाबत चक्क पंत्रप्रधान कार्यालयाकडे देखील तक्रार केली होती. अखेर याबाबतचे वृत्त रत्नागिरी खबरदार च्या माध्यमातून प्रसिद्ध होताच यंत्रणा कामाला लागली आणि भाजप माजी नगरसेवकांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच परिसरातील एका हॉटेलच्या चेंबर मधून हे दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येत होते. याबाबत अनेकवेळा या माजी नगरसेवकांनी या हॉटेल चालकाला सांगितले. मात्र तो याकडे दुर्लक्ष करीत होता असे बोलले जाते. याबाबत या माजी नगरसेवकांनी नगरपालिकेशी संपर्क साधला असता त्यांनी शहरामध्ये गॅस पाईप लाईन टाकणाऱ्या कंपनीचे हे काम असल्याचे सांगितले. या रस्त्यावरून येजा करणाऱ्यांना या दुर्गंधीयुक्त पाण्याचा कमालीचा त्रास होत होता. अखेर रत्नागिरी खबरदार ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच यंत्रणा कामाला लागली आणि येथील कामाला सुरुवात झाली.
याच हॉटेलच्या चेंबर मध्ये कचरा अडकल्याने सर्व पाणी रस्त्यावर येत होते. जेसीबी च्या साहाय्याने याचा शोध घेण्यात आला आणि हा अडकलेला कचरा बाहेर काढण्यात आला. आता उर्वरित काम मी स्वतः करुन घेतो असे हॉटेल चालकाने नगरपालिकेला सांगितले आहे, अशी माहिती मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:56 20-12-2024