रत्नागिरी : कसोप येथील सर्वंकष विद्यामंदिर (एस. व्ही. एम) प्रशालेचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४-२५ मोठ्या जल्लोषात साजरा झाला. शाळेच्या भव्य मैदानावर दिनांक १८ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत क्रीडामहोत्सव पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी श्री. ललित बुधाकोटी आणि शाळेचे संस्थापक अर्जुन गद्रे यांची विशेष उपस्थिती लाभली.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शाळेतील विद्यार्थ्यांनी आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत तालुका ते राष्ट्र पातळीवर तायक्वांदो, बॅडमिंटन, स्विमिंग, नेमबाजी यासारख्या विविध क्रीडाप्रकारात ३० हून अधिक पदकांची कमाई केली होती. त्यामुळे शाळेच्या या चौथ्या वार्षिक क्रीडा महोत्सवाला विशेष रंगत प्राप्त झाली.
कार्यक्रमाची सुरुवात १८ डिसेंबर रोजी रंगीबेरंगी फुग्यांचे आकाशात सोडून करण्यात आली. त्यादिवशी पूर्व प्राथमिक विभाग आणि शाळेच्या मँगो ट्री च्या विद्यार्थ्यांची विविध आकर्षक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी महोत्सवात कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल आणि हँडबॉलसारख्या सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
तसेच १०० मीटर, २०० मीटर धावणे, ४०० मीटर रिले, थाळीफेक, आणि गोळाफेक, बॅडमिंटन यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. सर्व क्रीडास्पर्धा या ‘इंटर हाऊस’ घेण्यात आल्या. अर्थात शाळेतील इयत्ता पहिली ते अकरावी चे विद्यार्थी मंगलयान, गगनयान, लिओ आणि फिनिक्स या गटात विभागलेले असून त्यात वार्षिक सर्वसाधारण क्रीडा चषक पटकावण्याची चढाओढ लागते. विजेत्या संघांना शिल्ड, प्रमाणपत्रे आणि वैयक्तिक विजेत्यांना पदके देऊन गौरवण्यात आले. यात ब्लू हाऊस (गगनयान) गटाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यप्रदर्शनांनी उपस्थितांची मने जिंकली.
महोत्सवाला प्रमुख उपस्थिती लाभलेले श्री. ललित बुधाकोटी मार्गदर्शन करताना म्हणाले की क्रीडा महोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण आणि स्पर्धेची भावना रुजवली जाते तसेच विद्यार्थ्यांनी विजय आणि पराजय खिलाडूवृत्तीने स्वीकारून अधिकाधिक उत्तम कामगिरी करून यश संपादन करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ओळखून त्यांना खेळासाठी प्रोत्साहित करणे आणि गणित, विज्ञान प्रमाणेच ‘खेळ’ या विषयालाही पालकांनी महत्व द्यावे असे आवाहन शाळेचे संस्थापक अर्जुन गद्रे यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यपिका मोनिका जयस्वाल यांनी वर्षभरातील शालेय आणि आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा ते राष्ट्रीय पातळीवर पदके पटकावलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून वार्षिक अहवालाचे वाचन केले.
महोत्सवाच्या शेवटी पालकवर्ग आणि माजी विद्यार्थी यांच्यात क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका मोनिका जयस्वाल आणि पर्यवेक्षिका झेबा परकार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:08 20-12-2024