रत्नागिरी : राज्याचे माजी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पसरला आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर ना. उदय सामंत हे २२ डिसेंबर रोजी प्रथमच रत्नागिरीत येत असून, त्यांच्या स्वागतसाठी भव्य मिरवणूक मारुती मंदिरपासून काढण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. डीजे, ढोलताशे, फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करीत ही मिरवणूक निघणार आहे.
रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे माजी उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी उद्योग विभागाची कामगिरी मागील अडीच वर्षात आपल्या कार्यकर्तुत्वाने उंचावली आहे. त्यामुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात उदय सामंत यांच्याकडे एका चांगल्या खात्याची कमान जाण्याची शक्यता आहे. किंवा त्यांच्या पुन्हा उद्योग विभागाची धुरा दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरु झाली आहे. सुरुवातीला आरोग्य आणि एमएमआयडीए या विभागाची जबाबदारी सामंत यांना दिली जाण्याची चर्चाही होती. परंतु ना. सामंत यांना कोणती जबाबदारी मिळते याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. तीन दिवसापूर्वी ना. सामंत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नागपूरमध्ये अधिवेशन सुरु असल्याने रविवारी ना. उदय सामंत हे मंत्रिपद जाहीर झाल्यावर रविवारी प्रथमच रत्नागिरीत येणार आहेत.
यावेळी मतदार संघाकडून त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. ना. सामंत हे मुंबईतून रस्तेमार्गे येण्याची शक्यता असून, त्यांचे खेड, चिपळूण, संगमेश्वर येथे जल्लोषात स्वागत होणार आहे. रविवारी सायंकाळी त्यांचे रत्नागिरीतील मारुती मंदिरपासून मोठी जल्लोषी मिरवणूक काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करुन ही मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे.
मतदार संघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामधून कार्यकर्ते या जल्लोषी मिरवणुकीची वाट पहात आहे. रत्नागिरी शहरामधूनही मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक सहभागी होणार आहे. डिजे, ढोलताशे, फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करीत ही मिरवणूक निघणार आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मिरवणुकीसाठी कंबर कसली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 21/Dec/2024














