चिपळूण : केंद्र व राज्य सरकारकडून स्वच्छ भारत स्वच्छ अभियान ही योजना राबवली जात आहे. स्वच्छता नसल्यास गावात रोगराई पसरू शकते. त्याची जबाबदारी स्थानिक स्तरावर नगर पालिका, ग्रामपंचायतीकडे सोपवल्या आहेत. लोकहिताच्या काही योजना राबविण्याचे अधिकार त्यांना शासनानेच दिले आहेत. मात्र, सध्या ग्रामपंचायतीच्या अधिकारावरच गदा आणली जात आहे. ग्रामपंचायतीस निधी वापराचा अधिकार असताना थेट शासनस्तरावरून ठेकेदार नेमून त्याचा पुरवठा सुरू आहे. त्यानुसार कचरा गोळा करण्यास घंटागाड्या पाठविण्यात आल्या आहेत. त्याची बिले मात्र ग्रामपंचायतींना द्यावी लागतात. या कारभारावर माजी सभापती शौकत मुकादम यांनी आक्षेप घेतला आहे.

स्वच्छता अभियान अंतर्गत आराखडा तयार झाल्यानंतर शासनस्तरावरून ग्रामपंचायतींना निधी वितरीत करण्यात आला. या अभियानात समाविष्ट असलेल्या कचरा संकलनासाठी घंटागाडीची तरतूद होती. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यासाठी एकच ठेकेदार नेमून बॅटरीवर चालणाऱ्या या घंटागाड्या पुरविण्यात आल्या. या घंटागाड्या देताना ग्रामपंचायतीला पूर्वसूचना किंवा विचारणा केलेली नाही. ३ ते ५ हजार अथवा त्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील कचरा या घंटागाडीने उचलला जाणार आहे का? तो कचरा टाकण्याची व्यवस्था त्या-त्या गावामध्ये आहे का? याचा कोणताही विचार झालेला नाही. ग्रामपंचायतींना विश्वासात का घेतले गेले नाही? कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावणे, त्यावर खत प्रकल्प करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असली तरी त्यांना शासनाकडून योग्य ते मार्गदर्शन केले जात नाही.
सध्या पुरवठा झालेल्या तीनचाकी घंटागाड्या गावातील डोंगरी भागात जाऊ शकत नाहीत, मग त्याचा काय उपयोग? कचरा संकलनासाठी चारचाकी अथवा टॅक्टर ट्रॉली का दिल्या नाही, या गाड्यांमुळे मोठ्या गावात कचरा उचलण्यावरुन वाद-विवाद निर्माण होण्याची शक्यता असून त्याला ग्रामपंचायतीला सामोरे जावे लागणार आहे.
एखाद्या गावात कचऱ्याची निर्मिती किती होते याचे कधीही सर्व्हेक्षण झालेली नाही. कचरा उचलण्याच्या नावाखाली ग्रामपंचायतीस छोट्या गाड्या देऊन त्याचा फायदा नाही. यापूर्वी जिल्ह्यात जिथे या गाड्या घेण्यात आल्या, त्याचाही अपेक्षित वापर होत नाही. त्यामुळे शासनाने असे प्रकार आता बंद करावे, अशी मागणीही मुकादम यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 21/Dec/2024
