पाली : मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या प्रमुख दोन राष्ट्रीय महामार्गावरील पाली बाजारपेठेचे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात मोठ्या प्रमाणावर विस्थापन झाले आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना बाजारपेठेच्यादृष्टीने सोयीचा उड्डाणपूल मंजूर झाला, परंतु तो कमी उंचीच्या खांबांमुळे तो अर्ध्या बाजारपेठेला अडथळ्याचा होणार आहे.

पाली बाजारपेठेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रथम २०१७ मध्ये येथे ३५० मीटर लांबीचा १७खांबांचा उड्डाणपूल मंजूर केला व त्यानुसार त्या पुलाचे बांधकाम सुरू झाले. काही वर्षे हे काम संथ होते; मात्र गतवर्षी २०२४ मध्ये या पुलाची रचना बदलून येथे येकी १० मीटरवर असे अधिकचे १७असे एकूण ३५ खांब नियोजनात आले. त्याचे काम सुरू आहे; परंतु या नवीन पुलाची रचना ही कमी
उंचीची केल्यामुळे तो वाहतुकीस त्रासदायक झाला आहे. उड्डाणपूल सहापदरी केल्यामुळे याची रुंदीही ३७ ते ३८ मीटर झाली. येथील भूसंपादन हे फक्त ४५ मीटर रुंदीचे असल्याने पुलाच्या दुतर्फा साडेपाच मीटर रुंदीचेच सेवा रस्ते होऊ शकतील, ते रहदारीस अडथळा ठरणार आहे.
या पुलाखालून मिऱ्या-नागपूर हा दुसरा राष्ट्रीय महामार्ग याच सेवा रस्त्याने जाणार असल्याने तो अरुंद धोकादायक झाला आहे. भविष्यात येथे नाणीजप्रमाणे ९ मोटर रुंदीचा सेवारस्ता प्रस्तारित करावा लागणार आहे. त्यामुळे पुन्हा येथे संपादन विस्थापन हा प्रश्न जटिल होणार आहे
अजून वर्षभर वाहतूककोंडी
पूल पूर्ण व्हायला अजून एक वर्ष लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वर्षभर तरी येथे वाहतूककोंडी कायम राहणार आहे. सेवारस्त्यावर करवयाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना व पालीतिठा ५० मीटरच्या सेवारस्त्याचे डांबरीकरण न करता तो वर्षभर कच्चाच ठेवल्याने तो धोकादायक झालेला आहे. येथे सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याने येथे अनेकदा अपघात घडत आहेत, मोठा अपघात होण्याअगोदर येथील डांबरीकरण करण्याची आश्यकता आहे.
पाली बाजारपेठेतील प्रस्तावित उड्डाणपुलामुळे येथील व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुलाची उंची तातडीने वाढवण्याची आवश्यकता आहे अन्यथा भविष्यात येथे अरुंद रस्ते व कमी उंचीच्या उड्डाणपुलाच्या खालील भागामुळे रहदारीस अडथळा होईल तसेच व्यापाराचे नुकसान होईल. त्यामुळे सार्वजनिक बांधकान विभागाने याकडे तक्ष देण्याची आवश्यकता आहे- संकेत जाधव, व्यापारी, पाली
धुळीचा त्रास
सहा वर्षे हे काम सुरू असल्याने येथे धुळीचे साम्राज्य असल्याने येथील व्यापाऱ्यांना दुकानातील मालाची नासाडी होण्याबरोबरच आरोग्याच्याही समस्या जाणवत आहेत. पालीतील जरी स्थानिक व्यापारी व ग्रामस्थांच्या सोयीसाठी हा उड्डाणपूल असल्याचे सांगितले जात असले तरी तो त्रासदायक आला आहे.
पाली बाजारपेठेतील उड्डाणपूल मुंबईच्या बाजूकडे आणखी १०० मीटर लांब खाली उतरवणे गरजेचे आहे. कारण, पाली-वळके, पाली-निवसर, पाली चिंद्रवली व पाली बावनदी हा मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी मार्गावर जाण्यासाठी आता थेट वळावे लागणार आहे. ते धोकादायक आहे. हे सर्व रस्ते कायमच वर्दळीचे असल्यामुळे तेथे अपघातांचाही मोठी धोका आहे. त्यामुळे पुलाखालून अंडरपास ठेवल्यास अपघाताचे धोके कमी होतील. – सचिन आग्रे, निवसर
बाजारपेठेतील उड्डाणपूल हा त्याच्या कमी उंचीच्या खांबांच्या रचनेमुळे स्थानिक व्यापारउदिमावर विपरित परिणाम करणारा ठरणार आहे. त्यामुळे येथे योग्य त्या उपाययोजना अवलंबून खांबांची उंची वाढवण्याची आवश्यकता आहे. येथील स्थानिकांचा अनेक वर्षे सुरू असणा-या चौपदरीकरणाच्या प्रलंबित कामामुळे किमान धुळीचा होणारा त्रास तरी लवकर थांबते आवश्यक आहे. – विकास पेठकरी, पाली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:52 PM 18/Apr/2025














