राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची चिपळुणात चिंतन बैठक

चिपळूण : विधानसभा निवडणुकीत कमी कालावधी मिळाला; परंतु आपण चांगली लढत दिली. कोणत्या चुका झाल्या आहेत हे आमच्या लक्षात आले आहे. विरोधी उमेदवाराने गेली दहा वर्षे काम केले होते. ते सुख-दुःखात सहभागी होत आले आहेत. आम्ही २५ हजार मताधिक्याची तयारी केली असती तर विजय नक्कीच झाला असता, आपल्याकडे नेते जास्त कार्यकर्ते कमी आहेत, तेव्हा पुढच्या काळात कार्यकर्ते जास्त तयार व्हायला पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी केले.

विधानसमा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले यादव पराभव झाला मात्र त्यानंतर पराभवाची कारणमिमांसा करतानय आगामी वाटचाल करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची चिंतन बैठक चिपळूण येथील हॉटेल अभिरुचीच्या सभागृहात झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीच्यादृ‌ष्टीने मनोगत व्यक्त केले. या वेळी यादव म्हणाले, विधानसभा निवडणुकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह वरिष्ठ नेते व तुम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. त्यामुळे कमी कालावधीत आपण चांगली झाकत देऊ शकतो. सर्वांनी खचून न जाता अगामी निवडणुकांच्यादृ‌ष्टीने माजी आमदार रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागूया एकमेकांना मानसन्मान द्या. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.

या प्रसंगी माजी आमदार रमेश कदम म्हणाले, संघटनावाढीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. त्यासाठी गावनिहाय दौरे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. येत्या पाच वर्षात राजकीय परिस्थिती तीच राहील, हे माहिती नाही; परंतु आपले संघटन असणे आवश्यक आहे. पहिल्या निवडणुकीत मला अपयश आले होते. दुसऱ्या निवडणुकीत यश मिळाले. तसे यादव यांना दुसऱ्यावेळी यश नक्कीच मिळेल.

या बैठकीला तालुकाध्यक्ष मुराद अडेकर, शहराध्यक्ष रतन पवार, महिला आघाडी तालुकाध्यक्षा राधा शिंदे, माजी नगरसेवक शिरीष काटकर, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष दत्ता पवार, सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर जबले, गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष योगेश शिर्के, नयना पवार युवकचे तालुकाध्यक्ष रोहन नलावडे आदि उपस्थित होते.

आता लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्थांवर
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्यादृष्टीने लोकांमध्ये जा, विश्वास निर्माण करा, कार्यकर्ते निर्माण करा. माझी निवडणूक झाली म्हणून बाजूला होणार नाही. कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी सोबत राहणार आहे. महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाऊ, असे यादव यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 21/Dec/2024