रत्नागिरी : हापूस आंब्याचे उत्पादन यंदा २५ टक्केच?

रत्नागिरी : बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन यंदा २५ टक्केच राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे मे महिन्यात आंबा कमीच राहील. मात्र सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात पेट्या दाखल होत असल्याने पाच डझनांच्या पेटीचा दर ३ हजार रुपयांपर्यंत आहे.

हा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र डागी मालाला कवडीमोलाच दर मिळत असल्याने अनेक आंबा बागायतदारांनी आंबा कॅनिंगला देण्यास सुरुवात केली आहे. सध्या बाजारात कॅनिंगसाठीचा आंबा ४० रुपये किलोने दराने खरेदी केला जात आहे.

या वर्षी पहिल्या टप्प्यात मोहरच आला नाही. तर पुढील दोन टप्प्यांत आलेला मोहर वांझ ठरला. डिसेंबरमध्ये आलेल्या मोहराचे उत्पादन सुरू झाले आहे. तेही एकाचवेळी हाती येत आहे. वातावरणातील बदलामुळे या वर्षी २५ ते ३० टक्के हापूसचे उत्पादन हाती येईल, असे बागायतदारांकडून सांगितले जात आहे.

सध्या एप्रिलमध्ये वाशी बाजारात कोकणातून सुमारे ६० ते ६५ हजार पेट्या दररोज दाखल होत आहेत. परिणामी, दरही घसरलेले आहेत. मुंबईतील वाशी बाजारात हापूस आंबा पेट्यांची आवक वाढल्याने दर कमी होऊ लागले. सध्या पंधराशे ते २००० रुपये पेटीचा दर आहे. त्यामुळे पावस परिसरात किलोवर आंबा देण्यास सुरुवात झाली आहे. आरंभी ६० ते ६५ रुपये किलोचा दर होता. परंतु दिवसेंदिवस आंब्याची आवक वाढल्यामुळे किलोच्या दरात घसरण झालेली आहे. त्यामुळे सध्या किलोचा दर ४० रुपये झाला आहे.

तो आणखी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सुरुवातीला कमी असलेला आंबा नंतरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आवक वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे पावस परिसरात दिवसाला दहा ते पंधरा टन आंबा किलोवर खरेदी केला जात आहे. हा आंबा स्थानिक कॅनिंग फॅक्टरित विकत घेतला जातो. या परिसरात बाहेरून दरवर्षी येणाऱ्या व्यापाऱ्यांचा प्रवेश झालेला नाही. त्यांनी आंबा खरेदी करण्यास सुरुवात केल्यास दरात आणखी घसरण होईल, अशी भीती स्थानिक विक्रेत्यांना आहे. आंबा बागायतदार विभव पटवर्धन म्हणाले, की यावर्षी एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्यांची आवक असली तरीही हंगाम १० मेपर्यंतच राहील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:23 26-04-2025