अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे रत्नागिरीत उद्या जिल्हास्तरीय अधिवेशन

रत्नागिरी : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ संलग्न अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण अधिवेशन येत्या दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता, रत्ननगरीतील स्वयंवर मंगल कार्यालय, माळ नाका येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचा मुख्य उद्देश सामान्य शिक्षकांच्या समस्या व आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवणे हा आहे.
या अधिवेशनात शिक्षकांसमोरील अनेक ज्वलंत विषयांवर चर्चा आणि मंथन होणार आहे. यामध्ये शिक्षकांवर लादली जाणारी अशैक्षणिक कामे, संचमान्यतेसाठी असलेल्या जाचक अटी, जुनी पेन्शन योजना लागू करणे, कॅशलेस मेडिक्लेम योजना, शिक्षण सेवक पद रद्द करण्याची मागणी, शिक्षकांमधून विस्तार अधिकारी पदांची भरती, पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीतील सुधारणा, तसेच आंतर जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील सुधारणा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश असणार आहे.

या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत, राज्याचे गृह शहर, महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज समिती मंत्री नामदार योगेश कदम, जिल्ह्यातील आमदार भास्कर जाधव, किरण (भैय्या) सामंत, आ. शेखर निकम यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीमुळे अधिवेशनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील अखिल भारतीय शिक्षक संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना एकजूट दाखवून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. हे अधिवेशन शिक्षकांच्या हक्कांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 26-04-2025