लांजा, राजापूरच्या पाणीटंचाई आराखड्याबाबत आमदार किरण सामंत यांची बैठक

रत्नागिरी : यंदा मोसमी पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी राहील, असा अंदाज आहे; मात्र तरीही जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्रत्येक तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करून पाठवावा, असे पत्र पंचायत समितींना पाठवण्यात आले आहे. त्यानुसार लांजा व राजापूर या दोन्ही तालुक्यांच्या बैठका आमदारांच्या अध्यक्षतेखाली झाल्या आहेत; मात्र उर्वरित सातही तालुक्यांकडून कार्यवाही झालेली नाही.

दरवर्षी मार्च महिन्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात होते. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत टंचाईची तीव्रता वाढलेली दिसते. त्याला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विंधन विहिरी खोदाई करणे, टँकरचे नियोजन करणे, गावातील पाणी योजनांची दुरुस्ती करणे, अशा उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा बनवण्यात येतो. ही जबाबदारी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे असते. प्रत्येक तालुक्याचा टंचाई आराखडा बनवून तो राज्य शासनाकडे पाठवण्यात येतो. आमदारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करून तालुक्याचा टंचाई आराखडा बनवला जातो. यंदा मागील महिन्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे तालुक्यातील टंचाई आराखड्याच्या बैठका तातडीने घ्याव्यात, अशा सूचना पंचायत समितींना दिल्या गेल्या आहेत. त्यात लांजा व राजापूर येथील टंचाईविषयीच्या बैठका तेथील आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांचे आराखडे लवकरात लवकर तयार होतील; मात्र उर्वरित तालुक्यांकडून अजूनही कार्यवाही झालेली नाही.

आराखड्यास वेळ लागण्याची शक्यता
रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे कॅबिनेट मंत्री तर आमदार योगेश कदम राज्यमंत्री झाल्यामुळे त्या विधानसभा मतदारसंघातील टंचाई बैठकांना विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा रत्नागिरी जिल्ह्याचा आराखडाही उशिरा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:21 PM 21/Dec/2024