रत्नागिरी : मल्लखांब सर्वश्रेष्ठ खेळ प्रकार आहे.सध्या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे निरोगी जगायचं असेल तर क्रीडा क्षेत्राकडे वळले पाहिजे, असे मत पद्मश्री श्री उदय देशपांडे यांनी नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात ‘स्पंदन २०२४ वार्षिक स्नेहसंमेलनातील ‘जिमखाना डे’वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी डॉ.साहिल दाभोळकर उपस्थित होते. चेअरमन श्री.मंगेश तांबे, नियामक समिती सदस्य श्री.शांताराम जोशी, प्राचार्य डॉ माधव बापट, स्नेहसंमेलन समिती प्रमुख प्रा.सुरेश नामदास आदी मंचावर उपस्थित होते.
आजच्या तरुणाला जागतिक स्तरावर वावरण्याचा बहुमान मल्लाखांबमुळे मिळत आहे
आज मल्लखांब हा क्रीडा प्रकार भारतात तर आहेच आहे पण जगातल्या अनेक देशांमध्ये सुद्धा खेळला जातो. आज हा क्रीडा प्रकार जागतिक स्तरावर पोहचलेला आहे. आज भारतामध्ये ५०० ठिकाणी मल्लखांब क्रीडा प्रशिक्षण केंद्रे आहेत. आजच्या तरुणाला जागतिक स्तरावर वावरण्याचा बहुमान या क्रीडाप्रकारामुळे मिळत आहे. मला पद्मश्री पुरस्कार मिळाला असला तरी तो माझा नसून मल्लखांब खेळणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे असे मत पद्मश्री उदय देशपांडे यांनी व्यक्त केले.
उदय देशपांडे यांना मल्लखांब क्रीडा प्रकारामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. मल्लखांब प्रकार देश विदेशात पोहचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
डीबीजेच्या क्रीडा विभागाने नेहमीच महाविद्यालयाचे नाव उंचावले
प्राचार्य डॉ.माधव बापट यांनी प्रास्ताविकपर मनोगतात ‘डीबीजेच्या क्रीडा विभागाने नेहमीच महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे’, असे मत व्यक्त केले. प्रा व्हि.पी.जोशी यांनी कनिष्ठ क्रीडा विभागाचे अहवाल वाचन केले. डॉ.सम्राट माने यांनी वरिष्ठ महाविद्यालयीन क्रीडा विभागाचे अहवाल वाचन केले. संस्थेच्या नियामक समितीचे सदस्य श्री शांताराम जोशी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना महाविद्यालयाचा क्रीडा विभाग महत्त्वपूर्ण विभाग आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाकडे लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले.
डॉ साहिल दाभोळकर यांनी आपल्या मनोगतात ‘महाविद्यालयाचे स्थान माझ्या आयुष्यात महत्त्वाचे आहे.सर्व शिक्षकांनी योग्य व महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.’ अश्या भावना व्यक्त केल्या.पारितोषिक वितरणाचे यादी वाचन प्रा.जीवनराज कांबळे, प्रा.उल्हास मोहिते, प्रा.राम कदम, प्रा.सर्वेश कुंंदर्गी यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. अतुल चितळे,खजिनदार श्री.संजीव खरे, नियामक समिती सदस्य श्री.अविनाश जोशी, उपप्राचार्य डॉ. आर.एम. मोरे, डॉ चेतन आठवले, उपप्राचार्य प्रा.नामदेव तळप, पर्यवेक्षिका सौ.स्नेहल कुलकर्णी, रजिस्ट्रार श्री.अनिल कलकुटकी आदी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिल भादुले व प्रा. सौ.प्राजक्ता चितळे यांनी केले. क्रीडा विभाग विद्यार्थी प्रतिनिधी यश बामणे यांनी आभार प्रदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 26-12-2024