लांजा : आंजणारी घाटीत इनोव्हा कारला आयशर टेम्पोची पाठीमागून धडक; सहाजण जखमी

लांजा : इनोव्हा कारला आयशर टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने इनोव्हा कार पुढे असलेल्या एस. क्रॉस कारवर धडकली. या अपघातामध्ये एकूण सहाजण जखमी झाले. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटी येथे रात्री मंगळवारी १२.३० वाजताच्या सुमारास घडला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राजेश श्रीनिवास कामत (वय ६३ राहणार हाऊस ऑफ लॉर्ड, गोवा) हे आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (क्रमांक जीए ०७ ई २२६८) मध्ये मित्रांसह लखुमन हरून खान (वय ७५) याला पनवेल येथे डॉक्टरकडे घेऊन गेले होते. पनवेल येथुन पुन्हा गोवाकडे जात असताना रात्री १२.३० वाजता लांजा तालुक्यातील आंजणारी घाट उतरत असताना पाठीमागून आलेल्या आणि गोव्याचे दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोने (क्रमांक एम. एच.४३, बी.एक्स. ७४००) इनोवा कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे इनोवा कार पुढे असलेल्या एस क्रॉस कारवर (क्रमांक एम. एच.०८ एजी ५१७२) जावून धडकली.

त्यानंतर आयशर टेम्पो हा मुंबई गोवा महामार्गाच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाला. या अपघातात इनोव्हा कारमधील रखुमन हरून खान (वय ७५, चिंबळ पणजी गोवा), तसेच चंद्रकांत लक्ष्मण कलगुटकर (७८, मापसा गोवा), कुणाल रामाण्णा जिरगे (वय ३० वर्षे राहणार कळंबा पणजी) हे तसेच टेम्पो चालक व अन्य दोन असे एकूण सहाजण जखमी झाले.

या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र कांबळे हे करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 26/Dec/2024