आता सुईशिवायही मिळणार इंजेक्शन?

मुंबई : इंजेक्शन म्हटले की टोचल्याच्या वेदना होणार असे डोक्यात येते. आता मात्र मुंबई आयआयटीच्या संशोधकांनी यावर उपाय शोधला आहे. संशोधकांनी शॉकवेव्ह नावाची एक सिरींज विकसित केली असून ती वेदनारहित आहे.

या सिरींजच्या साहाय्याने दाब देऊन शरीरात इंजेक्शन देता येते यामुळे दुखापत आणि संसर्गाचा धोका देखील कमी होईल असा संशोधकांचा दावा आहे. डॉक्टर मानवी शरीरात औषधे पोहोचवण्यासाठी इंजेक्शन वापरतात, पण सुईची अनेकांनी भीती असते त्यामुळे अनेकदा लहान मुलांना लसीकरण करणे कठीण होते. मधुमेही ज्यांना नियमितपणे इन्सुलिन घ्यावे लागते तेही यासाठी टाळाटाळ करतात. आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक वीरेन मेनेजेस यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने ‘शॉक सिरींज’चा वापर करून सुई न टोचता शरीरात औषधे पोहोचविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांचा अभ्यास अहवाल ‘जर्नल ऑफ बायोमेडिकल मटेरिअल्स अँड डिव्हाइसेस’मध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात त्यांनी शॉक सिरिजद्वारे दिलेले औषध आणि प्रयोगशाळेतील उंदरांवर इंजेक्शनच्या सुईने इंजेक्शन दिलेल्या औषधाची तुलना केली.

शॉक सिरीजची कार्यप्रणाली
नियमित सुई असलेली सिरींज त्वचेला छिद्र करते तर शॉक सिरिंजमध्ये ही समस्या नसते. त्याऐवजी ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणाऱ्या उच्च ऊर्जा शॉक वेव्हचा वापर त्वचेला छिद्र पाडण्यासाठी केला जातो. जेव्हा या लहरी निर्माण होतात तेव्हा त्या आजूबाजूचे माध्यम जसे की हवा किंवा पाण्याला प्रेशर करतात. प्रेशराइज्ड नायट्रोजन वायू औषधाने भरलेल्या शॉक सिरिंजवर दाब लागू करून द्रव औषधाचा बारीक स्प्रे तयार करतो. या स्प्रेचा वेग विमानाच्या टेक-ऑफच्या वेगापेक्षा दुप्पट असतो. द्रव औषधाची ही फवारणी सिरिंजच्या तोंडातून बाहेर पडते आणि त्वचेत जाते. ही संपूर्ण प्रक्रिया रुग्णाला काही कळण्यापूर्वी अतिशय वेगाने घडते.

असे आहे शॉक सिरींज
शॉक सिरींज नियमित बॉलपॉइंट पेनपेक्षा किंचित लांब असतात. हे २०२१ मध्ये तयार केले गेले. या उपकरणात सूक्ष्म शॉक ट्यूब असते आणि त्याचे तीन भाग असतात. ड्रायव्हर, एक संचालित भाग आणि ड्रग वाहक भाग जो शॉक वेव्ह वापरून मायक्रोजेट तयार करण्यासाठी एकत्र काम करतो. हे औषध स्प्रे होल्डरमध्ये वितरित करते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 28/Dec/2024