संगमेश्वर : रत्नागिरी जिह्यातील बहुतांश कोकण रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलते आहे. त्यात संगमेश्वर रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. या स्थानकाच्या सौंदर्याच्या प्रेमात सर्वच प्रवासी पडले आहेत. या स्थानकातील बगिचा या सौंदर्यात मोठी भर पाडली आहे. हा बगिचा संगमेश्वर तालुक्यातील दोन व गुहागर येथील एक अशा तीन तरुण शेतकऱ्यांनी सजवला आहे.
साहिल गांधी, शुभम दोरकडे व स्मित कदम या तीन तरूण शेतकऱ्यांनी एकत्र येत श्री एस अॅग्रो डेव्हलपर्स नावाने फार्म उभी केली आहे. या फार्मद्वारे फळबाग लागवड व मेंटेनन्स, खत व तण व्यवस्थापन, लाॅन लागवड आणि मेंटेनन्स व कृषी विषयक सल्ला दिला जात असतो. या तरुणांनी स्वतः चे शेती व्यवसायदेखील सुरू ठेवले आहेत. तीनही विद्यार्थी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठातील बी एस्सी. हॉर्टिकल्वरिस्ट विषयाचे पदवीधर आहेत शिक्षणानंतर नोकरी न करता तिघांनीही स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत व यात त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. साहिल गांधी हा भाजीपाला व कलिंगड रोपांची निर्मिती करून शेतकऱ्याना विक्री करतो. शुभम दोरकडे यांनी स्वतःची बाग आणि नर्सरी निर्माण केली असून, कलिंगडाचे उत्पादन घेतो. स्मित कदम याने स्वतःची बाग याबरोबरच मोठ्या प्रमाणात गांडूळ खत निर्मिती केली आहे. या तरुणांनी रत्नागिरीतील अरिहंत पार्क येथील बंगलो बगिचे सजवले आहेत. शेतीतील काम पाहून संगमेश्वर रेल्वेस्थानकाचा कामापालट करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या तीन तरुणांकडे दिली. या तरुणांनी उभारलेल्या बगिचाने रेल्वेस्थानकाव्या सौंदर्यात मोठी भर पाडली आहे. रेल्वे स्थानकात उभे राहिल्यानंतर पुढील बाजूने स्थानकाचे बाह्य सौंदर्यदेखील खुलून दिसत आहे. तरूणांनी योग्य झाडांची निवड करून लागवड केली आहे. याचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे. स्थानकाला चांगला साज चढवला असल्याने प्रवाशांना स्थानकात प्रवेश करताना आनंद होत आहे.
हे आहेत बदल
रेल्वेस्थानकाच्या पुढील बाजूस असलेली मोकळी जागा उपयोगात आणून त्यामध्ये सी आकाराचा बगिचा निर्माण केला आहे. त्यासाठी त्यांनी डुरांटा, अॅकल्फा ब्लॅक फायकस, क्रिस्टिना या शोभेच्या रोपांची लागवड केली आहे. त्यात विविध चाफे लावून हा परिसर सुशोभित केला आहे. त्यामुळे संगमेश्वर स्थानकाचं रूपडं पालटलं आहे. तेथील नक्षीकाम सर्वांना भुरळ पाडत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 28/Dec/2024














