उनाड कुत्र्यांची दापोली शहरात दहशत

दापोली : भटक्या कुत्र्यांची दापोली शहर आणि परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून, अनेक नागरिकांवर त्यांनी हल्ले केल्याचे प्रकार पुढे आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी एका वृद्ध व्यक्तीवर कुत्र्याने हल्ला केला आणि त्यात त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली आहे. त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांत भटकी कुत्री चावल्याच्या ५४४ घटनांची नोंद दापोली तालुक्यात झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दापोली शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठयांपर्यंत अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. दापोलीतील काही ठराविक ठिकाणी मुख्य रस्त्याला जोडलेल्या आतील रस्त्यांवर हे कुत्रे मोठ्या संख्येने दबा धरून बसलेले असतात. आतील रस्त्यांवरून वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वारांचा ते पाठलाग करतात. शहरातील खोंडा परिसरात अकबर अली आयनरकर यांच्यावर कुत्र्याने हल्ला करून पायाचा चावा घेतला. त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांकरिता हलविण्यात आले. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यातदेखील जाहिद कॉम्प्लेक्समध्ये एका वर्षाच्या लहान मुलीवर हल्ला करून तिला जखमी केले होते. भटक्या कुत्र्यांना चावल्याचे प्रकार दापोलीत घडत आहेत. याबाबत नगरपंचायत प्रशासनाला दापोली शहरातील नागरिकांनी निवेदने दिली आहेत. खोंडा परिसरात नागरिकांवरील हल्ल्यानंतर पुन्हा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हर्णेमध्येदेखील कुत्र्यांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. रस्त्यावर गाडी चालवताना कुत्रे गाडयांचा पाठलाग करतात. काही धाडसी दुचाकीचालक प्रसंगावधान राखून गाडी वेगाने हाकतात; मात्र एखादेवेळी घाबरलेल्या चालकाला अपघात होतो. त्यामुळे नगरपंचायतीकडून यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

देव बलवत्तर म्हणून पायावरच निभावलं
मी दापोली खोंडा परिसरात राहतो. २६ च्या रात्री घराच्या परिसरात फिरताना अचानक मागून येऊन एका कुत्र्याने हल्ला केला आणि डाव्या पायाचा चावा घेतला. कशीबशी सुटका करून घेतली. देव बलवत्तर म्हणून पायावरच प्रसंग निभावला. भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना व्हावी, असे अकबर अली आयनरकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:41 PM 28/Dec/2024