चिपळूण : वाढीव घरपट्टी विरोधातील सुनावणीकडे ७५५ तक्रारदारांची पाठ

चिपळूण : शहरातील मालमत्ता कराच्या वाढीविरोधात २२०० नागरिकांनी हरकती घेतल्या. त्या संदर्भात पालिकेने चार दिवस सुनावणी घेतली. त्यामध्ये ११४५ मालमत्ताधारक सुनावणीच्या वेळी हजर राहिले, ७५५ लोकांनी दांडी मारली. ज्यांच्या हरकती आहेत त्यांचे पुन्हा सर्वेक्षण केले जाणार आहे.

येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात वाढीव घरपट्टीच्या विरोधात सुनावणी सुरू होती. २८ डिसेंबरपर्यंत हरकत व तक्रार स्वीकारण्याची शेवटची मुदत होती. घरपट्टीच्या विरोधात काही तक्रार असल्यास पालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन पालिकेने केल्यानंतर पहिल्या दिवशी ९०० लोकांनी तक्रारी केल्या होत्या. शहरातील सर्व पक्षीय नेत्यांनी यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर तब्बल २२०० नागरिकांच्या तक्रारी दाखल झाल्या.

त्यानंतर चिपळूण पालिका आणि नगररचनाकार विभागाने येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नागरिकांच्या हरकतीवर सुनावणी घेतली. ज्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य नाही अशांचा सर्वे केला जाणार नाही असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र ज्यांनी खरंच घराच्या रचनेत बदल केली आहे त्यांना वाढीव घरपट्टी येणार असे पालिकेने स्पष्ट केले होते.

चतुर्थ वार्षिक श्रेणी आकारणांनुसार पालिका प्रशासनाकडून यावर्षी शहरातील रहिवास व व्यावसायिक मालमत्ता धारकांच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रामुख्याने चार वर्षांनी होणारे सर्वेक्षण गेल्या काही वर्षात न झाल्याने यावर्षी झालेल्या सर्वेक्षणात मालमत्ता धारकांच्या कर रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. प्रामुख्याने सदोष आणि चुकीच्या पद्धतीने झालेल्या सर्वेक्षणामुळे मालमत्ता करात अवास्तव वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सुरू झाल्या आहेत. या तक्रारीची सुनावणी गुरुवारपासून सांस्कृतिक केंद्रात सुरू झाली. पहिल्याच दिवशी पहिल्या टप्प्याच्या सुनावणीत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

संबंधितांच्या तक्रारीचे पुन्हा सर्वेक्षण
सकाळच्या पहिल्या टप्प्यात हरकती व तक्रारी नोंदविण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नगररचना विभागातून आलेल्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या तीन दालनात नागरिकांच्या हरकती व तक्रारी नोंदविण्याचे काम सुरू केले. त्यानुसार संबंधित नागरिकांनी पूर्वीची घरपट्टी रक्कम, वाढीव आलेली रक्कम, त्याबाबत असलेली हरकत व तक्रार तसेच आक्षेप यांची नोंद योग्य पुराव्यासह करून घेण्याचे काम सुरू झाले. त्यानुसार अधिकाऱ्यांकडून तक्रारदार नागरिकांकडून दिलेली माहिती व पुरावे यांची पडताळणी करून संबंधित नागरिकांकडून नियोजित अर्जावर स्वाक्षरी घेतली गेली व संबंधितांच्या तक्रारीचे पुन्हा सर्वेक्षण केले जाईल, असे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 30/Dec/2024