गणपतीपुळ्यातील महागाई मुळे पर्यटकांची रत्नागिरी शहराला अधिक पसंती

रत्नागिरी : देवदर्शना सोबतच पर्यटनासाठी लाखोंच्या संखेने पर्यटक कोकणात येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी सुट्यांच्या हंगामात मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या पर्यटकांच्या संख्येसोबत येथील सेवा सुविधांच्या दारात देखील मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. गणपतीपुळ्यात गर्दीच्या वेळी हॉटेल मध्ये राहण्याचे दर गगनाला भिडलेले असतात. तोंडाला येईल तो आकडा येथील हॉटेल चालक सांगतात असे पर्यटकांचे म्हणणे आहे.

नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने देखील मोठ्या संख्येने रत्नागिरीत पर्यटक आले आहेत. मात्र अनेकांनी येथील महागाईमुळे गणपतीपुळ्यात वास्तव्य न करता रत्नागिरी शहराला अधिक पसंती दिली आहे. गणपतीपुळे येथील एका हॉटेल ने तर ३१ डिसेंबर साठी एका दिवसाचा दर चक्क २५००० इतका ठेवला आहे. गणपतीपुळे येथील गर्दी वाढताच येथील दर देखील प्रचंड पटीने वाढतात व पर्यटकांची लुटमार केली जाते असे आरोप अनेक पर्यटकांनी केले आहेत. मात्र याउलट रत्नागिरी शहरात मात्र निवासाचा खर्च कमी येतो. शिवाय येथील हॉटेल चालक सीझनमध्ये अशा पद्धतीने आपले दर वाढवत नाहीत, अशी माहिती रत्नागिरी मधील हॉटेल चालकांनी दिली आहे.

रत्नागिरी पासून गणपतीपुळे अवघ्या २४ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे रत्नागिरीत वास्तव्य करून केवळ दर्शनासाठी गणपतीपुळ्यात जाणे पर्यटकांना अधिक परवडू लागले आहे. रत्नागिरी शहरातील तारांगण, थिबा पॅलेस, जिजामाता उद्यान, रत्नदुर्ग किल्ला, शिवसृष्टी यांसारखी अनेक ठिकाणे देखील पर्यटकांना पाहता येत असल्याने शिवाय पावस देखील १५ किलोमीटर अंतरावर असल्याने पर्यटक आता राहण्यासाठी रत्नागिरी शहराला अधिक पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे या हंगामात रत्नागिरी शहरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेले पहावयास मिळत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 31-12-2024