लांजात दिवसाढवळ्या घर फोडी, साडेचार लाखांचा ऐवज लांबवला; परिसरात भीतीचे वातावरण

लांजा : शहरातील नेहमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणच्या रॉयल पार्क कॉम्प्लेसमध्य दिवसाढवळ्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने काढून कपाटातील चार तोळ्यांच्या सोन्यासह रोख रक्कम असा सुमारे चार ते साडेचार लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लांजा शहर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यात बऱ्याच दिवसांनी चोरीच्या घटनेने डोके वर काढले आहे. या घटनेने लांजा शहरात चोरट्यांबाबत भीती व्यक्त केली जात आहे. शहरात मुंबई गोवा महामार्गाशेजारी नेहमी गजबजलेल्या ठिकाणी रॉयल पार्क ही इमारत आहे. या इमारतीमध्ये रुहिदा हनीफ नेवरेकर यांची तिसऱ्या माळ्यावर सदनिका आहे. रुहिदा या घरामध्ये एकट्याच राहतात. रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास रुहिदा या घरचा मुख्य दरवाजा बंद करून इमारतीमध्येच राहत असलेल्या नातेवाईक याच्याकडे गेल्या होत्या. काही कालावधीने त्या आपल्या घरी परत आल्या असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरात आतमध्ये जाऊन पाहिले असता, घरातील गोदरेज कपाट तोडून सोन्याचे दागिने, बांगड्या, अंगठ्या व बारा हजार रोख रक्कम अशा ऐवजाची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तत्काळ लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी इमारतीसह आजुबाजूचा परिसराची पाहणी केली. अज्ञात चोरट्याविरूध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडीच्या घटनेबाबत धागेदोरे न मिळाल्याने अधिक तपासासाठी दुपारनंतर रत्नागिरी येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत तपास सुरू होता. या घटनेने लांजा शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. लांजा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शहरात तीन वर्षांपूर्वी अशाच चोरीच्या घटना घडल्या होत्या. दि. ११ जानेवारी २०२१ ला कुवे येथे उभ्या असलेल्या कारमधून दागिन्यांची पर्स चोरी, २७ ऑक्टोबर २०२१ रोजी माऊली नगर येथे दागिने चोरी, ७ मे २०२१ रोजी एक शेतीफार्ममधूम पाणीपंपच्या बॅटऱ्या चोऱ्यांच्या घटना घडल्या होत्या. त्या नंतर तीन वर्षांनी पुन्हा चोरीच्या घटनेने डोके वर काढले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 30/Sep/2024