Yuva Sena Ratnagiri: तुषार साळवी यांच्याकडे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदाची धुरा; विकास गोगावले यांच्या स्वाक्षरीने पत्र जारी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून, युवासेना रत्‍नागिरी तालुकाप्रमुख तुषार साळवी यांची शिवसेना पक्षाच्या “युवासेना दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख” पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. युवासेनेचे सचिव आणि कोअर कमिटी सदस्य विकास भरतशेठ गोगावले यांच्या स्वाक्षरीने १० जून २०२६ रोजी हे अधिकृत नियुक्ती पत्र जारी करण्यात आले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, तसेच शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली आहे. युवासेनेचे वरिष्ठ नेते पूर्वेशभाई सरनाईक यांच्या आदेशानुसार आणि कोकण विभागाचे युवासेना सचिव विकास गोगावले यांच्या सूचनेनुसार हे नियुक्ती पत्र साळवी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे खंदे समर्थक म्हणून तुषार साळवी यांची ओळख आहे. एकत्रित शिवसेनेत असतानाही २०१४ पासून त्यांनी रत्नागिरी तालुक्याचे युवक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. शिवसेना दुभंगल्यानंतरही त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची साथ न सोडता पक्षात आपले स्थान कायम राखले. सामंत यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी आणि राजकीय काम तडीस नेण्यात साळवी यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

गेल्या बारा वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यामध्ये युवकांची मजबूत संघटन बांधणी करत तुषार साळवी यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक लक्षवेधी उपक्रम राबवले आहेत. दरवर्षी आयोजित केले जाणारे महारक्तदान शिबीर हा त्यांच्या उपक्रमांचा मुख्य भाग राहिला असून, याद्वारे शासकीय रुग्णालयाला वेळोवेळी आवश्यकतेनुसार रक्त पुरवठा करण्यात आला आहे. केवळ शहरापुरते मर्यादित न राहता विविध पंचक्रोशींच्या ठिकाणी युवकांच्या मदतीने त्यांनी रक्तदान आणि आरोग्य शिबिरे आयोजित करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

शैक्षणिक क्षेत्रात युवा वर्गाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सातत्याने सकारात्मक पाठपुरावा केला आहे. त्यांच्या याच दीर्घकालीन संघटन कौशल्याची आणि सामाजिक कार्याची दखल घेत वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या खांद्यावर आता अधिक मोठी जबाबदारी सोपवली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून, आगामी काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी ते सर्वांना सोबत घेऊन काम करतील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या पत्राद्वारे व्यक्त केला आहे.

दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदाची धुरा हाती आल्यानंतर आता साळवी यांच्यावर रत्नागिरी शहरासह रत्नागिरी तालुका, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये शिवसेनेच्या युवा संघटनेची मजबूत मोट बांधण्याचे थेट आव्हान असणार आहे. या नियुक्तीनंतर जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तुषार साळवी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी आपल्याला या पदासाठी योग्य समजून ही मोठी जबाबदारी दिली आहे. वरिष्ठ नेतृत्वाने आणि ना. सामंत सरांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी दक्षिण रत्नागिरीत संघटन वाढीसाठी कायम प्रयत्नशील राहीन,” अशी प्रतिक्रिया नूतन जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांनी आपली नियुक्ती जाहीर झाल्यानंतर दिली.