गुहागरमध्ये महावितरणचा निष्काळजीपणा: भूमिगत वीज केबलच्या डीपीतून शॉक लागून गाईचा दुर्दैवी मृत्यू

गुहागर: गुहागरमध्ये महावितरणचा निष्काळजीपणा आणि ढिसाळ कारभार समोर आला असून, तालुक्यातील धोपावे बंदर येथे नवीन भूमिगत वीज केबलच्या डीपीमधून अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने एका गाईचा जागीच शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. धोपावे बंदर परिसरात नुकतेच महावितरणकडून कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण होताच पहिल्याच काही दिवसांत थेट विजेचा धक्का लागून पाळीव जनावराचा मृत्यू झाल्यामुळे या कामाच्या दर्जावर आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निवासी वस्ती आणि रहदारीच्या मार्गावरच उघड्या केबलचे साम्राज्य

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तो धोपावे बंदर परिसर गावातील मुख्य वाडी-वस्तीच्या अगदी जवळ आहे. या भागातून दररोज स्थानिक नागरिक, लहान मुले, दुचाकी-चारचाकी वाहने आणि पाळीव जनावरांची मोठ्या प्रमाणावर सतत वर्दळ असते. असे असूनही महावितरणच्या संबंधित ठेकेदाराने अत्यंत निष्काळजीपणे हे काम केल्याचे उघड झाले आहे. तांत्रिक नियमांनुसार केबल पूर्णपणे जमिनीखाली सुरक्षित खोलीवर गाडणे आवश्यक होते, मात्र प्रत्यक्ष कामात तसे झाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

केवळ नावालाच पाईपचा वापर; काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप

धोपावे येथील नागरिकांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर कंत्राटदाराचा मोठा हलगर्जीपणा समोर आणला आहे. वीज केबल सुरक्षितपणे जमिनीखाली टाकण्याऐवजी केवळ नावालाच प्लास्टिक पाईपचा वापर करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मुख्य वीज वाहक केबल जमिनीवर उघड्या अवस्थेत पडलेली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा दमट हवामानात या उघड्या केबलमधून वीज प्रवाह थेट जमिनीवर किंवा लोखंडी खांबांमध्ये उतरण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. आज याच निष्काळजीपणाचा बळी एका निरपराध गाईला द्यावा लागला असून, ती डीपीच्या संपर्कात येताच विजेचा तीव्र झटका बसून मृत पावली.

मानवी जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

या दुर्दैवी घटनेनंतर धोपावे बंदर परिसरातील स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आज एका मुक्या जनावराचा जीव गेला असला, तरी भविष्यात याच निवासी परिसरात एखाद्या लहान मुलासोबत किंवा नागरिकांसोबत अशीच दुर्घटना घडल्यास या मानवी जीवितहानीला नक्की जबाबदार कोण धरणार, असा रोकडा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या गंभीर प्रकरणाची महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः दखल घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

धोपावे येथील जागरूक नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित वीज वितरण विभागाने तातडीने धोपावे बंदर येथे येऊन या निकृष्ट कामाची आणि अपघातस्थळाची रीतसर पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी ठेकेदारासह त्याला पाठीशी घालणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि उघड्यावर असलेल्या सर्व वीज केबल तातडीने सुरक्षितपणे जमिनीखाली गाडण्यात याव्यात, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 12-06-2026