संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर- निढलेवाडी येथे चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात चालकासह पाच प्रवासी जखमी झाले. त्यात तीन मुलांचा समावेश असून, सर्व जखमींवर संगमेश्वर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरीत नेणार असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

हा अपघात काल दुपारी झाला. शौकत बाबा मुल्लाजी (मूळ गाव चिखली, ता. संगमेश्वर, सध्या रा. रत्नागिरी) हे मोटार घेऊन चिखली येथून रत्नागिरीकडे जात होते. या गाडीत त्यांच्या बरोबर आफ्रिन मुबीन खाल्फे (वय ३३), हिजान मुवीन खाल्फे (१० वर्ष), अलमीरा मुबीन खाल्फे (१४, सर्व रा. रत्नागिरी, धनजीनाका), फिजा नजीब खांचे (२९), आफ्राज खांचे (६, सर्व रा. रत्नागिरी, शिवाजी नगर) हे प्रवास करत होते. संगमेश्वर येथून जवळच असलेल्या हॉटेल पुढे निढळेवाडी येथे आल्यावर चालक शौकत मुल्लाजी यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि मोटार अर्धा ते एक फूट उंच असलेल्या रस्त्यावरून थेट कच्च्या रस्त्यावर उतरून खडीच्या ढिगाऱ्यांवर आदळली.
प्रवाशांचे दैव बलवत्तर
अपघात घडला त्या ठिकाणी खडीचे ढिगारे नसते, तर जवळ अंतरावरच असलेल्या नदीत गाडी गेली असती. त्यामध्ये गंभीर दुर्घटना घडली असती, असे घटनास्थळी गेलेल्या स्थानिक नागरिकांनी सांगितले. गाडीतील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे प्रवाशांना कमी दुखापत झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 02/Jan/2025














