चिपळूण लोकअदालतीत ५५९ प्रकरणे निकाली

रत्नागिरी : जिल्हा न्यायालय, चिपळूण येथे २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये ६५९ पैकी १०० प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणात एकूण रक्कम ९५ लाख ४६ हजार ८७ रूपये रकमेची तडजोड होवून प्रकरणे निकाली निघाली. तसेच २१ वादपूर्व प्रकरणात रक्कम १३ लाख २७ हजार ३२३ इतक्या रकमेची तडजोड होवून वसुली झाली.

या लोकअदालतीमध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय व जिल्हा न्यायालय येथील एकूण प्रलंबित प्रकरणे ६५९ व १ हजार ४९४ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये विविध बँका, पतसंस्था, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, इतर वित्तीय संस्था आणि नुकसान भरपाईचे अर्ज तसेच कौटूंबिक हिंसाचाराची व पोटगीची प्रकरणे सादर करण्यात आली होती. त्यासाठी न्यायाधीश व वकीलांचे तीन पॅनेल कार्यरत होते.

लोकअदालतीचे कामकाज जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, पी. आर. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश व .एम.आर. काळे, सह दिवाणी न्यायाधीश, पॅनल विधीज्ञ अॕड. एन.जी.लाड, अॕड. श्रीमती नयना पवार, अॕड.आर.व्ही. बापट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या लोकअदालतीमध्ये ६५९ पैकी १०० प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणात एकूण रक्कम ९५ लाख ४६ हजार ८७ रूपये रकमेची तडजोड होवून प्रकरणे निकाली निघाली. तसेच २१ वादपूर्व प्रकरणात रक्कम १३ लाख २७ हजार ३२३ इतक्या रकमेची तडजोड होवून वसुली झाली. यामुळे पक्षकारांच्या वेळेचा व पैशांचा अपव्यय टळला.

चिपळूण शहरात शनिवारी दिवसभरात प्रचंड पाऊस असून देखील पक्षकार, वकील, पोलीस, पतसंस्था विविध बँकांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कोकण रेल्वेचे पोलिस कर्मचारी हे त्यांची प्रकरणे लोकअदालतीमध्ये तडजोड करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पॅनलवरील न्यायाधीश व पॅनल विधिज्ञ यांनी प्रकरण तडजोड होण्याकामी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

लोकअदालतीमध्ये अनेक वर्षांची जुनी प्रलंबित प्रकरणे, ज्येष्ठ नागरिकांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, अनेक जुने प्रलंबित दावे, अपिल, मोटार अपघात नुकसान भरपाई दावे, रेल्वेची प्रकरणे, बँकांची वसुली प्रकरणे व वादपूर्व प्रकरणे यांचा मोठ्या प्रमाणात तडजोडीने निपटारा करण्यात आला. या लोकअदालतीसाठी ज्येष्ठ विधीज्ञ व्ही. व्ही. शिगवण, एस. डी. तावडे, व्ही. एन. वाडकर, ओ. के. चिकटे, अजय कांबळी, सरकारी वकील, रेल्वे सुरक्षा बलचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी उपस्थित राहून तालुका विधी सेवा समिती चिपळूण यांना सहकार्य केले. अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश चिपळूण डॉ. अनिता नेवसे यांनी सर्वांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 30/Sep/2024