सायबर गुन्हे जागरूकता महत्वाची : कौशिक मुसळे

रत्नागिरी : राष्ट्रीय सेवा योजना विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या निवासी शिबिराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षिततेची माहिती देण्यासाठी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

‘सायबर शिक्षण सायबर सुरक्षा’ मोहिमेंतर्गत क्विक हील फाउंडेशनच्या सायबर वॉरियर्स क्लब ऑफ GJC च्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कौशिक चंद्रशेखर मुसळे, अलैस हबीब सोलकर यांनी स्वयंसेवकाना सायबर सुरक्षा संदर्भात माहिती दिली.

कौशिक चंद्रशेखर मुसळे, अलैस हबीब सोलकर सायबर वॉरियर्स क्लबचे कार्यकर्ते आहेत. या मार्गदर्शना मध्ये त्यांनी विविध सायबर गुन्ह्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. सायबर धोके ओळखणे: फिशिंग ईमेल्स, मालवेअर, आणि संशयास्पद ऑनलाइन व्यवहार ओळखण्याचे मार्ग. ऑनलाइन सुरक्षितता: सोशल मीडिया खात्यांचे संरक्षण, फसवणुकीपासून बचाव, आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण. सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदविणे: सायबर गुन्हे कसे आणि कुठे नोंदवायचे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कौशिक मुसळे यांनी सायबर सुरक्षिततेच्या वाढत्या महत्त्वावर भर दिला. ‘जागरूकता ही सायबर धोके टाळण्यासाठी आपली पहिली ढाल आहे,’ असे ते म्हणाले आणि विद्यार्थ्यांना जबाबदारीने ऑनलाइन वागण्याचे आवाहन केले. अलैस सोलकर यांनी रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन आणि सोपे उपाय सांगून सत्र अधिक प्रभावी केले. ‘क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक छोटी चूक मोठ्या अडचणींना आमंत्रण देऊ शकते,’ अशी सूचना त्यांनी स्वयंसेवकान दिली. हे सत्र विद्यार्थ्यांसाठी अत्यंत संवादात्मक होते. वास्तविक उदाहरणे, प्रश्नोत्तर सत्र, आणि प्रकरणांवर आधारित चर्चांमुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास सोपे झाले.

‘हे सत्र खूप माहितीपूर्ण होते! सायबर गुन्हे टाळण्यासाठी आपण किती सतर्क असणे गरजेचे आहे, याची जाणीव आज झाली,’ असे विद्यार्थ्यानी सांगितले. सायबर गुन्हे जागरूकता व्याख्यान विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात यशस्वी ठरले. डिजिटल युगातील हे तरुण आता ऑनलाइन जग अधिक सुरक्षित आणि जबाबदारपणे हाताळण्यासाठी सज्ज आहेत. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता पसरविण्याचा निर्धार करून करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा सचिन सनागरे, प्रा. उमा जोशी, प्रा हर्षदा पटवर्धन आणि एन.एस.एस. स्वयंसेवक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:00 08-01-2025