२८ जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी मूळ ओळखपत्र अनिवार्य; व्हाइटनर आणि ब्लेडच्या वापरावर निर्बंध
पुणे: MAHA TET Exam Guidelines अंतर्गत शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Council of Examination) येत्या २८ जून रोजी राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या महाटीईटी परीक्षे संदर्भात सविस्तर आणि कडक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षे दरम्यान होणारे संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी परीक्षा परिषदेने कंबर कसली असून उमेदवारांना केंद्रावर पाळावयाच्या नियमांची विस्तृत यादी जाहीर केली आहे.
कपडे आणि बुरख्याबाबत परीक्षा परिषदेचे स्पष्टीकरण
या नव्या नियमावलीमध्ये महिला उमेदवारांच्या पेहरावाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. महिला उमेदवारांना परीक्षा केंद्रावर कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य राहील. मात्र, परीक्षा केंद्रावरील लाईव्ह सीसीटीव्ही (Live CCTV) कॅमेऱ्यात सर्व उमेदवारांचे चेहरे स्पष्ट दिसावेत, यासाठी एक अट घालण्यात आली आहे. त्यानुसार, प्रत्यक्ष परीक्षा सुरू असताना वर्गखोलीत उमेदवारांच्या मानेच्या वर म्हणजेच कानावर, डोक्यावर किंवा संपूर्ण चेहऱ्यावर व तोंडावर कोणत्याही प्रकारचा कपडा किंवा आवरण असता कामा नये, जेणेकरून उमेदवाराची ओळख पटवणे सोपे होईल.
बूट घालण्यास सक्त मनाई; हलक्या पादत्राणांचा वापर करावा
परीक्षा परिषदेने दिलेल्या सूचनेनुसार, परीक्षार्थींना कुठल्याही प्रकारे बूट (शूज) घालून वर्गखोल्यांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर येताना चप्पल, स्लीपर, सॅंडल किंवा इतर हलके फुटवेअर घालून यावे, असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, ओएमआर शीट (OMR Sheet) भरण्याबाबतही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायांपैकी कोणते तरी एकच उत्तर बरोबर असेल. उमेदवाराने एकदा गिरवलेला पर्याय नंतर बदलता येणार नाही. तसेच आधी नोंदवलेले उत्तर पुसण्यासाठी खोडरबर (Eraser), ब्लेड किंवा व्हाइटनरचा (Whitener) उपयोग करण्यास सक्त मनाई आहे. अशा उपकरणांचा वापर केलेल्या उत्तरांना शून्य गुण दिले जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
ओरिजिनल ओळखपत्राचे बंधन; झेरॉक्स चालणार नाही
परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांकडे खालील पाचपैकी किमान एक मूळ (Original) ओळखपत्र असणे अत्यंत बंधनकारक आहे: १. पॅनकार्ड (PAN Card) २. मतदान कार्ड (Voter ID) ३. ड्रायव्हिंग लायसन्स / स्मार्ट कार्ड ४. पासपोर्ट (Passport) ५. आधारकार्ड (Aadhaar Card)
विशेष नोंद म्हणजे, या ओळखपत्रांची केवळ छायांकित प्रत (Xerox) ग्राह्य धरली जाणार नाही, तर मूळ दस्तऐवज सोबत असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवारांना वर्गात केवळ पारदर्शक पाण्याची बाटली सोबत ठेवण्यास परवानगी असेल. तसेच, पेपर सुरळीतपणे देता यावा यासाठी प्रत्येक परीक्षार्थीने पेपर सुरू होण्याच्या किमान २० मिनिटे आधी संबंधित परीक्षा केंद्रावर पोहोचणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 26-06-2026














