Ratnagiri Railway News: रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील लघवी शुल्क रद्द होणार? युवासेनेच्या तक्रारीनंतर वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर

५ रुपयांच्या शुल्काबाबत प्रसाद सावंत यांची आक्रमक भूमिका; बेलापूर मुख्य कार्यालयाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा

रत्नागिरी: Ratnagiri Railway News | कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून लघवीसाठी (Urinals) आकारल्या जाणाऱ्या ५ रुपयांच्या शुल्काबाबत आता मोठे प्रशासकीय पावले उचलली जात आहेत. युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांनी या शुल्काबाबत केलेल्या अधिकृत तक्रारीची कोकण रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील प्रसाधनगृहात लघवीसाठी आकारले जाणारे हे शुल्क पूर्णपणे रद्द करून ती सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मंडळ वाणिज्य प्रबंधक शैलेश आंबर्डेकर यांनी या संदर्भात स्वतः प्रसाद सावंत यांना लेखी पत्र पाठवून अधिकृत माहिती दिली आहे.

१ एप्रिलपासून ‘चालवा व देखभाल’ तत्त्वावर दिला होता ठेका

रेल्वे प्रशासनाने पत्रात नमूद केल्याप्रमाणे, रत्नागिरी स्थानकावरील प्रसाधनगृहाचा ठेका १ एप्रिलपासून “चालवा व देखभाल” (Operate and Maintain) या तत्त्वावर एका खाजगी एजन्सीला देण्यात आला आहे. या नव्या ठेक्यातील अटी व शर्तींनुसार, लघवीसाठी युरिनल्स वापरण्यावर ५ रुपये शुल्क आकारण्याची अधिकृत तरतूद करण्यात आली होती. हे शुल्क झोनल रेल्वे धोरणानुसार (Zonal Railway Policy) आकारले जात असल्याने ठेकेदारावर थेट कारवाई करता येत नसल्याचे प्रशासनाने सुरुवातीला स्पष्ट केले होते.

बेलापूर निगम कार्यालयाकडे पाठवला अंतिम प्रस्ताव

मात्र, प्रवाशांवर पडणारा हा भुर्दंड आणि प्रसाद सावंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत स्थानिक प्रशासनाने आता नमते घेतले आहे. रत्नागिरी स्थानकावरील हे ५ रुपयांचे शुल्क कायमचे रद्द करून प्रवाशांना ही मूलभूत सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘उचित निर्णय प्रस्ताव’ कोकण रेल्वेच्या बेलापूर (नवी मुंबई) येथील मुख्य निगम कार्यालयाकडे (Corporate Office) मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. आता बेलापूर येथील मुख्य कार्यालयाकडून यावर होणाऱ्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

१५ दिवसांत निर्णय न झाल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा

कोकण रेल्वे प्रशासनाकडून २२ जून रोजी हे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. परंतु, केवळ पत्रावर समाधान न मानता युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिला आहे. “आगामी पंधरा दिवसांच्या आत या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होऊन हे शुल्क रद्द झाले नाही, तर प्रसाधनगृहात ठेकेदाराचा माणूस दिसणार नाही,” असा आक्रमक पवित्रा सावंत यांनी घेतला आहे. या थेट इशाऱ्यामुळे आता बेलापूर कार्यालय यावर काय निर्णय घेते, याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 26-06-2026