मंडणगड : रोजगारासह शिक्षणाच्या समस्यामुळे गाव समृद्धीच्या वाटा मंदावल्या

मंडणगड : स्पर्धेच्या युगात रोजगार निर्मितीसह शैक्षणिक क्षेत्र अधिक विस्तारित न झाल्यामुळे मंडणगड तालुक्यातील कर्त्या लोकांनी उपजीविकेसाठी महानगरांकडे स्थलांतर केले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या साधनांचा अभाव कायम राहिल्यामुळे घरे कुलूपबंद झाली असून, गावे ओस पडलेली आहेत. परिणामी, नैसर्गिक वरदान लाभलेल्या तालुक्यातील गाव समृद्धीच्या वाटा मंदावल्या आहेत. रोजगार निर्मितीने त्या पुन्हा नव्याने वर्दळीच्या करण्याची गरज आहे.

तालुक्यात रोजगार निर्मितीत तत्कालीन लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन यांना अपयश आले आहे. त्यामुळे कर्ती लोकसंख्या प्रचंड प्रमाणात महानगराकडे स्थलांतरित झाल्याचे वास्तव आहे.

शहरीकरणामुळे गावपण संपत चालले आहे. लोकसंख्या घटते आहे. गाव संस्कृती बदलली आहे. काही गावे तर मुकी झाली व काहींची अवस्था बिकट झाली. गावात असणाऱ्या दुकानांवर त्याचा परिणाम होऊन गावोगावी असणारी किरकोळ, किराणा, खाऊंची दुकाने बंद झाली आहेत, त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांनी देखील नाइलाजास्तव नोकरीची वाट धरली. गावातील शाळा पटसंख्येअभावी बंद पडू लागलेल्या आहेत. रोजगार या समस्येमुळे किती गंभीर परिणाम होतात, हे दिसून येत आहे. गावातील माणसे दिसेनाशी झालेली आहेत. रोजगार निर्मितीचा उद्देश सफल करण्यासाठी पावले उचलणे अनिवार्य झाले आहे नाहीतर ही गावे भग्नावस्था कवटाळून बसतील, अशी भीती आहे. गावाचे गावपण टिकवायचं असेल तर आताच यावर उपाययोजना व्हायला हव्यात.

तालुका पातळींवर रोजगार नाही. परिणामी, सुशिक्षित व कर्ती पिढी स्थलांतरित होत आहे. बारमाही शेतीसह नैसर्गिक सुबत्तेतून पर्यटनाची दारे खुली होऊ शकतात. पायाभूत सुविधांपलीकडे विकास कधी, याची वाट पाहत मंडणगडकर आहे. जोपर्यंत आश्वासक असे रोजगारक्षम काही निर्माण होत नाही तोपर्यंत मुंबईकर गावाकडे पुन्हा वळणार नाहीत. कल्पेश डोंगरे, मंडणगडवासीय मुंबईकर

रोजगाराबाबत उपेक्षितच
पर्यटन, उद्योग व्यवसाय, कृषी यातून हाताला काम देण्याची मोठी संधी असतानाही याबाबत नेहमीच उदासीनता राहिल्यामुळे आजही मंडणगड तालुका रोजगाराबावत उपेक्षितच आहे. हाताला काम देण्यात अपयश आल्यामुळे बहुतांशी गावातील कुटुंबे ही मुंबई, पुण्यासारख्या शहरांत काम आणि मुलांच्या शिक्षणासाठी स्थलांतरित झालेली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या कालचक्रात गावच्या रचनेत भौगोलिकदृष्ट्या बदल झालेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 08/Jan/2025