Shill Dam Water Level: रत्नागिरीकरांना मोठा दिलासा! मुसळधार पावसामुळे शीळ धरणातील पाणीपातळीत लक्षणीय वाढ

दर सोमवारचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे नगर परिषदेचे नियोजन

रत्नागिरी: Shill dam water level च्या संदर्भात रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतातून अत्यंत दिलासादायक वृत्त समोर आले आहे. जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शीळ धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. धरणाची पाणीपातळी आता ११२.६० मीटरपर्यंत वाढली असून, एकूण उपयुक्त पाणीसाठा ०.९४० दशलक्ष घनमीटर (दलघमी) वर पोहोचला आहे. आठवड्यापूर्वी धरणातील साठा चिंताजनक पातळीवर गेल्यामुळे रत्नागिरी शहरावर घोंगावणारे तीव्र पाणीकपातीचे संकट आता टळण्याची चिन्हे आहेत.

आठवड्यापूर्वी निर्माण झाली होती पाणीकपातीची भीती

यंदा उन्हाळा लांबल्याने आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दडी मारल्यामुळे शीळ धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला होता. अवघ्या आठवड्यापूर्वी धरणातील साठा अवघा ०.४५३ दशलक्ष घनमीटर इतका खाली आला होता. धरणाची एकूण साठवण क्षमता ३.३३६ दशलक्ष घनमीटर असून, साठा अत्यंत मर्यादित राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र पाणीकपातीची भीती निर्माण झाली होती. प्रशासनालाही पाणी पुरवून वापरण्याचे नियोजन करावे लागत होते.

लांबलेल्या पावसाने बदलावा लागला होता पाणीपुरवठ्याचा पॅटर्न

पावसाळा लांबल्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी विभागाने महिनाभरापूर्वी एक मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार, धरणातील साठा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक सोमवारचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येऊ लागला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात तर परिस्थिती अशी झाली होती की, शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले होते. मात्र, त्याच आठवड्यात निसर्गाने साथ दिली, पाऊस पडला आणि ते संकट तात्पुरते टळले होते.

सततच्या पावसाने वाढला साठा; सोमवारची पाणीकपात थांबणार?

रत्नागिरी शहराला पाणीकपातीचा मोठा धोका निर्माण झालेला असतानाच, सोमवार रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार बँटिंग सुरू केली. मंगळवारी दिवसभर पावसाने आपले सातत्य राखल्यामुळे शीळ धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढला. दोन दिवसांतच साठा ०.९४० दलघमीवर पोहोचल्याने प्रशासनावरील ताण हलका झाला आहे. पावसाचे हे सातत्य पाहता, नगर परिषदेच्या पाणी विभागाने आता दर सोमवारी बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा पुन्हा नियमित सुरू ठेवण्याबाबत नवीन नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 24-06-2026