पारदर्शकता आणि अचूकतेसाठी निवडणूक आयोगाचे पाऊल; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची पत्रकार परिषदेत माहिती
रत्नागिरी: Ratnagiri voter list 2026 च्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात मतदार यादीचा ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ घोषित करण्यात आला असून, रत्नागिरी जिल्ह्यात या मोहिमेची प्रत्यक्ष सुरुवात आगामी ३० जूनपासून होणार आहे. या विशेष मोहिमेचे वेळापत्रक आणि सविस्तर माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी एका विशेष पत्रकार परिषदेत दिली. मतदार यादीत पारदर्शकता आणणे आणि ती पूर्णपणे अचूक करणे हा या सखोल पुनरीक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
मोहिमेचे महत्त्वाचे टप्पे आणि वेळापत्रक
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाकडून खालीलप्रमाणे विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत:
- तयारी, प्रशिक्षण व छपाई कालावधी: २० जून ते २९ जून
- BLO मार्फत घरोघरी भेटीचा कालावधी: ३० जून ते २९ जुलै
- मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण: २९ जुलै
- प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी: ५ ऑगस्ट
- दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी: ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर
- दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी: ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर
- अंतिम मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी: ७ ऑक्टोबर
नागरिकांनी मतदार यादीत नाव तपासण्याचे आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी आपल्या व आपल्या नातेवाईकांची नावे मतदार यादीत आहेत की नाही, याची खात्री voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर (Website) जाऊन करून घ्यावी. १ जुलै १९८७ पूर्वी, १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान आणि २ डिसेंबर २००४ नंतर भारतात जन्मलेल्या नागरिकांसाठी, तसेच भारताबाहेर जन्मलेल्या किंवा नागरिकत्व प्राप्त केलेल्या व्यक्तींसाठी नियमांनुसार स्वतःचे किंवा पालकांचे वैध पुरावे सादर करावे लागतील. आधार पडताळणीकरिता मार्गदर्शक निर्देश लागू राहतील.
विधानसभा मतदारसंघनिहाय नोंदणी अधिकारी जाहीर
पुनरीक्षण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी (ERO) खालीलप्रमाणे घोषित करण्यात आले आहेत:
| विधानसभा मतदारसंघ | मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि पद |
|---|---|
| दापोली विधानसभा | डॉ. विजयकुमार सूर्यवंशी (उपविभागीय अधिकारी, दापोली) |
| गुहागर विधानसभा | वैशाली पाटील (उपविभागीय अधिकारी, खेड) |
| खेड, चिपळूण विधानसभा | आकाश लिगाडे (उपविभागीय अधिकारी, चिपळूण) |
| रत्नागिरी विधानसभा | जीवन देसाई (उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी कार्यालय) |
| राजापूर विधानसभा | विश्वजीत गाताडे (उपविभागीय अधिकारी, राजापूर) |
प्रशासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि नवमतदारांनी सहभागी होऊन आपली नोंदणी निश्चित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:56 24-06-2026














