गिरीदुर्ग मनसंतोष, मनोहरगड पडवेच्या सुपुत्राकडून सर

राजापूर : तळकोकणातील आंबोली खोऱ्यातील (जि. सिंधुदुर्ग) घनदाट अभयारण्यातील ऐतिहासिक गिरीदुर्ग मनसंतोष आणि मनोहरगड हे पडवेचे सुपुत्र आणि दुर्गवडा गिर्यारोहक प्रथमेश वालम याने मित्र अनिल भोसले यांच्यासमवेत नुकतेच सर केले.

वेगाने वाहणारा सोसाट्याचा वारा, काहीशी घसरडी असलेली अवघड वाट, निमुळते अन् सरळ उभे सुळके आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रतिकूल स्थितीचा सामना करत सुमारे दोन तासांमध्ये गिरीदुर्ग मनसंतोष आणि मनोहरगड हे किल्ले सर केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या विविधांगी किल्ले शालेय जीवनामध्ये पाठ्यपुस्तकांमधून अभ्यासल्याने त्यांच्याबाबत प्रथमेश यांना नेहमीच आकर्षण राहिले. त्यातून, छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारसरणी आणि कार्यपद्धतीतून प्रेरित होऊन सह्याद्रीतील गडकोट व निसर्ग भटकंतीचे त्याला वेड लागले. पुणे येथे नोकरी करत असतानाही गडकिल्ल्यांवर चढाई करण्याचा छंद जोपासला आहे. आजपर्यंत दीडशेहून अधिक गडकिल्ले सर केले आहेत. त्याने नुकतेच आंबोली खोऱ्यातील गिरीदुर्ग मनसंतोष आणि मनोहरगड हे गडकिल्ले प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत सुमारे दोन तासांमध्ये सर केले. या वेळी निर्मनुष्य असलेल्या पायवाटेने पायपीट करताना तीन ते चार फुटांपर्यंत वाढलेली कारवी, काटेरी झाडी, जीर्ण झालेले गर्द जंगल याचा सामना त्यांना करावा लागला.

गिरीदुर्ग मनसंतोष, मनोहरगड
आंबोली खोऱ्याच्या घनदाट जंगलामध्ये शिवकाळामध्ये मनसंतोष आणि मनोहरगडाची बांधणी केल्याचे सांगितले जाते. आगऱ्याच्या सुखरूप सुटकेनंतर रांगणा गडाला पडलेला वेढा उठवून छत्रपती शिवाजी महाराज या गडावर आले होते. या ठिकाणी काही महिने विश्रांती घेतल्यानंतर ते राजगडावर पुन्हा परतले होते. कोरीव पायऱ्यांची वाट, उद्ध्वस्त दरवाजा, भक्कम बुरूज, गुप्त दरवाजा, मजबूत तटबंदी, चिरेबंदी वाड्याची वास्तू, औदुंबराच्या झाडाखाली असलेल्या श्री भैरोबाच्या मूर्ती, पिण्यायोग्य पाण्याची विहीर, भलीमोठी गुहा, मनसंतोषगडाचा अंगावर येणारा सुळका, त्यावर एक-दोन वाड्यांची जोती, पाणी टाके असे अवशेष वा खुणा आजही त्या ठिकाणी आढळून येत असल्याचे दुर्गवीर प्रथमेश वालम यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 30/Sep/2024