रत्नागिरी जिल्हा भाजपमय करण्यासाठी सज्ज व्हा : खा. नारायण राणे

रत्नागिरी : अन्य जिल्ह्यांप्रमाणे हा जिल्हा सुद्धा भाजपाचा जिल्हा आहे हे दाखवण्यासाठी इथल्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागलं पाहिजे. सभासद नोंदणी करून भागणार नाही तर प्रत्येकापर्यंत पोहोचून टार्गेट ठेवून कामाला लागा आणि हा जिल्हा भाजपामय होण्यासाठी सज्ज व्हा, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी दक्षिण रत्नागिरीच्या सदस्य नोंदणी आढावा बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.

गुरूवारी रत्नागिरीत मराठा भवन येथे भाजपाच्या सदस्य नोंदणी संघटन पर्व आढावा बैठकीत खा. राणे बोलत होेते.

खा. राणे यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी या पाच तालुक्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या तालुकाध्यक्ष, युवक अध्यक्ष,महिला मोर्चासह विविध पदाधिकाऱ्यांची बैठक खा. राणे यांनी रत्नागिरीत घेतली. यावेळी बोलताना खा. राणे यांनी पक्ष आपल्या जीवनात किती महत्त्वाचा आहे याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याला करून दिली. यावेळी बोलताना खा. राणे म्हणाले, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे प्रशासकीय कामासाठी वेगळे असले तरीही माझ्यासाठी आजही हे दोन्ही जिल्हे एकच आहेत असे मी मानतो. दोन्ही ठिकाणची माणसं, दोन्ही ठिकाणचे राहणीमान तेच आहे. त्यामुळे जसं काम सिंधुदुर्गमध्ये होतं तितक्याच गांभीर्याने रत्नागिरीमध्ये सुद्धा सदस्य नोंदणीचे काम झालं पाहिजे.

केंद्रात आणि राज्यात आपलीच सत्ता आहे. त्यामुळे विकासाचा निधी हा मागितलाच पाहिजे व तुमचा अधिकार आहे. पण असं असताना आपण आपली जबाबदारी विसरता कामा नये. आज बाजूच्या जिल्ह्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत याचा विचार करून आपल्या कामाला आपण गती दिली पाहिजे, तुम्ही जितके बलवान,तुमचं संघटन जितकं मजबूत तितकंच आपले नेतृत्व बलवान होते. आज आपण आपले लोकप्रतिनिधी नाही म्हणून तक्रार करतो पण येत्या पाच वर्षात आपल्या पक्षाचे सरकार हवं असेल तर आत्तापासूनच प्रत्येकानं कामाला लागलं पाहिजे. आज जो मी आढावा प्रत्येक तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांकडून घेतला त्यावरून आपण किती काम केले ते पाहिले. यात अधिक प्रगती झाली पाहिजे. एक लक्ष्य निर्धारित ठेवून कामाला लागलं पाहिजे. हे काम करताना आपल्या प्रत्येकामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आपल्या हातात महागडा मोबाईल असला तरीही प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय त्यातून रिझल्ट मिळत नाही. म्हणूनच टार्गेट ठेवून काम करा. हा जिल्हा भाजपमय करायचा आहे हा मनात निर्धार करून कामाला लागा आणि जोमाने आणि जिद्दीने हे टार्गेट पूर्ण करा असे मार्गदर्शन खा. राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. पुन्हा एकदा १० ते १५ जानेवारी या कालावधीत केलेल्या सभासद नोंदणी कामाचा आढावा घेण्यासाठी मी स्वत: येणार असून त्यावेळी आपल्याला िदलेले १०० टक्के उद्दीष्ट आपण पूर्ण केलेले असेल असा िवश्वास खा. राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी भाजपा दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस अनिल कुमार करंगुटकर, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, जिल्हा सरचिटणीस प्रमोद अधटराव, भाजपाचे ज्येष्ठ नेते अॅड. बाबा परुळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दक्षिण भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकसंध बांधून ठेवण्यासाठी येथे विकास निधीची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असताना अभिमानाने आणि जोमाने काम केलं पाहिजे, दिलेले टार्गेट आणि सभासद नोंदणी आम्ही पूर्ण करू असा विश्वासही राजेश सावंत यांनी यावेळी दिला. तर ज्येष्ठ नेते बाबा परुळेकर यांनी प्रत्येकाने जनतेमध्ये जाऊन सदस्य नोंदणीचे काम जोमाने पूर्ण करूया आणि भाजपा पक्ष घराघरात पोहोचवूया असे आवाहन केले.

यावेळी िजल्हाध्यक्षांसह प्रत्येक तालुका मंडळ अध्यक्ष व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सदस्य नोंदणीचा आढावा खा. राणे यांच्यासमोर मांडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 10-01-2025