चिपळूण : शहरानजिकच्या जुवाड मिरजोळी येथील सावित्रीबाई आणि सावतामाळी शेतकरी स्वयंसहाय्यता गटातील महिला शेतकर्यांनी कृषी विज्ञान केंद्र कोल्हापूर-2 ला भेट दिली.
दिशान्तर संस्थेच्या अन्नपूर्णा प्रकल्पांतर्गत ही अभ्यास सहल नेण्यात आली. या माध्यमातून या अन्नपूर्णांनी आधुनिक शेती प्रात्यक्षिके तसेच नैसर्गिक खते, कीटक़नाशके आदींबाबतची माहिती घेतली. या भेटीतून महिला शेतकर्यांना अत्याधुनिक शेतीसंदर्भात उपयुक्त मार्गदर्शन लाभले.
कंसाई नेरोलॅक पेन्टस लि. व दिशान्तर चिपळूण यांच्यावतीने अन्नपूर्णा प्रकल्पांतर्गत या अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकर्यांसाठी सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी (ता. कोल्हापूर) येथे दि. 6 जानेवारी रोजी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कोल्हापूर-2 हे भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) स्थापन केलेले एक अग्रगण्य कृषी संशोधन व विस्तार केंद्र आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुरू असलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करून माहिती घेऊन त्यायोगे अधिक सक्षमपणे शाश्वत शेती व शेती आधारीत उपक्रम अन्नपूर्णा प्रकल्पांतर्गत राबविले जावेत हा यामागील उद्देश होता.
या सहलीत शेतकर्यांना केव्हीकेच्या सुविधांची माहिती देण्यात आली. अत्याधुनिक शेती पद्धती प्रात्यक्षिक प्लॉट्स, नैसर्गिक खत निर्मिती युनिट्स, नैसर्गिक कीटकनाशक, रोग नियंत्रक उत्पादन प्रात्यक्षिक, गो-पालन, शेळी पालन तसेच लघु उद्योग व कुटीर उद्योगांचे युनिटस्ना भेट देण्यात आली. याशिवाय, शेतकर्यांनी श्री सिद्धगिरी मठ आणि संग्रहालयाला भेट दिली. कृषी विज्ञान केंद्र कणेरी येथील कार्यक्रम सहाय्यक विश्वंभर जाधव यांनी या अभ्यास सहलीच्या नियोजन व अंमलबजावणीत योगदान दिले. सावित्रीबाई आणि सावतामाळी शेतकरी स्वयंसहाय्यता गटाचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी या अभ्यास सहलीत सहभाग दिला. संस्था सचिव सीमा यादव व संस्थेच्या खजिनदार शर्वरी कुडाळकर यांनी सहलीसाठी विशेष परिश्रम घेतले.
अन्नपूर्णा प्रकल्पातून शाश्वत प्रगतीचा ध्यास…
रासायनिक शेती आणि वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक शेती आणि उपजीविकांच्या आधारे शाश्वत प्रगती साधता येऊ शकते असा ठाम विश्वास घेऊन अन्नपूर्णा प्रकल्पाची निर्मिती झाली आहे. या प्रकल्पातील शेतकर्यांसाठी प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, अभ्यास सहलींंचे सातत्यपूर्ण नियोजन प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असते. यातून शेतकर्यांच्या ज्ञानात भर पडत असून आधुनिक शेती पद्धतीबाबतची माहिती मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 11-01-2025













