राजापूर : जलजीवन मिशन योजनेचे आराखडे बनवताना परिपत्रकातील महत्त्वाच्या बाबींचा समावेश केलेला नाही. पाण्याचे स्रोत निवडताना भविष्याचा वेध घेतलेला नाही. पाईपलाईन योग्य पद्धतीने टाकलेल्या नाहीत. परिणामी, जलजीवन योजना राजापूर तालुक्यात यशस्वी झालेली नाही. तालुक्यातील सर्व योजनांची सखोल चौकशी करावी अन्यथा प्रजासत्ताकदिनी (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू, अशा इशारा भालावलीचे माजी सरपंच श्रीकांत बागाव यांनी दिला आहे.
तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेविषयीचे निवदेन बागाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले आहे. जलजीवन मिशनचा राजापूर तालुक्याचा आराखडा सुमारे ९० कोटी रुपयांचा आहे. त्यात १९७ नळपाणी योजनांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील लोकांना घरोघरी नळयोजनाद्वारे मुबलक स्वरूपामध्ये पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचे गावोगावचे बनवण्यात आलेले आराखडे आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रारीचे सूर उमटत आहेत.
माजी सरपंच बागाव यांनी दिलेल्या निवेदनात जलजीवन मिशन योजनेबाबत विविध आक्षेप घेण्यात आले आहेत. योजनेचे आराखडे वा अंदाजपत्रक तयार करताना नियोजनाचा अभाव, परिपत्रकातील बाबींचा अंतर्भाव नाही, नळपाणी योजनांसाठी नैसर्गिक झरे आदी पाण्याचे स्रोत म्हणून निवड केली असली तरीही भविष्याचा वेध घेऊन पाण्याचे स्त्रोत टिकावेत, वाढावेत वा त्या ठिकाणी पाण्याचा साठा व्हावा, यादृष्टीने कोणतेही नियोजन नाही. पाईपलाईन टाकण्याच्या नियोजनाचा अभाव आदी मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 14/Jan/2025














