मासेमारीला नियम, शिस्त राहिली नाही : मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे

रत्नागिरी : नियम पाळून मासेमारी होत नाही. जो येतो तो टॉलर, एलईडी आदींद्वारे कुठून कसाही येऊन बेकायदेशीर मासेमारी करून जातो. नियम, शिस्त, धाक राहिलेला नाही. एकाच्या नावे दहा नौका. आम्हाला मत्स्योत्पादन वाढवायचे आहे. प्रामाणिक काम करण्याची तयारी ठेवा. कोणी मॅनेज झाल्याचे कळले, तर त्याची गय केली जाणार नाही. तुम्हाला नोकरी महत्त्वाची की, संबंध हे तुम्ही ठरवा, असा सज्जड दम मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांनी मत्स्यखात्याच्या अधिकाऱ्यांना भरला.

शासकीय विश्रामगृहात मत्स्य विभाग आणि सागरी सुरक्षेच्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. बैठकीला मत्स्य अधिकाऱ्यांनी प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिल्ली, एकूण किती बंदरे, लेंडिंग पॉईंट, एकूण परवानाधारक नौका, पर्ससीन नौका, मिनी पर्ससीन नौका, एकूण मासळी उत्पन्न, दंडात्मक कारवाईची वसुली आदींबाबत माहिती दिली. सर्व आढावा झाल्यानंतर नीतेश राणे यांनी समुद्रामध्ये जी बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे त्या सावळ्यागोंधळावर बोट ठेवले. त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. काय चालले आहे? कुठूनही कोणीही येतो आणि आपल्या सागरी जलदी क्षेत्रामध्ये मासेमारी करून जातो. आपल्या पारंपरिक मच्छीमारांनी, छोट्या मच्छीमारांनी काय करायचे? नियम, कायद्याचा धाक कुठे दिसतच नाही. जे लोक घुसखोरी करतात, बंदी असलेल्या एलईडीद्वारे मासेमारी करतात त्यांना माहिती आहे.

आपल्यावर कारवाई होणार नाही, अशी बदनामी आपल्या खात्याची झाली आहे, परवाना नाही त्या नौका बंदरात आहेत. यांना कोणाचा वरदहस्त आहे? झारीतील शुक्राचारी कोण आहे, हे शोधून काढायला वेळ लागणार नाही.

आम्हाला येत्या पाच वर्षांमध्ये ( मत्स्योत्पादन वाढवायचे आहे. एक आराखडा तयार करा. शासन म्हणून तुम्हाला जी मदत, जी ताकद लागेल ती मला सांगा आम्ही देऊ. अवैध मासेमारी थांबली पाहिजे. सागरी सुरक्षा सर्वांत महत्त्वाची आहे. त्यासाठी तुम्ही हे ब्लॅक मार्केट बंद करा. कारण, यामुळे आपल्या देशाचे आणि राज्याचे भविष्य खराब होणार आहे. अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर हे सर्व बेकायदेशीर प्रकार थांबतील, असेही राणे यानी सांगितले.

एके47 समोर पिस्तूल अशी स्थिती
आमच्या गस्ती नौका लाकडी आणि फायबरच्या घुसखोरी करणाऱ्यांच्या स्टीलच्या आणि हायस्पीड नौका आहेत. म्हणजे एके47 च्या समोर पिस्तूल चालवण्यासारखे आहे. यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. चांगल्या स्टीलच्या गस्ती नौका मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच याबाबत शासनाशी चर्चा केली जाईल, असे नीतेश राणे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 14/Jan/2025